ग्रामसेविकेला अश्लील शिवीगाळ, धमकावणी प्रकरणी ग्रामसेवक संघटनेचा काळ्याफीती लाऊन निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 05:44 PM2024-05-17T17:44:45+5:302024-05-17T17:46:11+5:30
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कामकाज करताना ग्रामसेवकांना नागरिकांकडून शिवीगाळ, मारहाण करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत.
मधुकर ठाकूर, उरण : महिला ग्रामसेविकेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी शुक्रवारी (१७) उरण ग्रामसेवक संघटनेच्या वतीने उरण पंचायत समितीच्या कार्यालयासमोरच काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निषेध कार्यक्रमात सहभागी झालेल्या ग्रामसेवकांनी विस्तार अधिकाऱ्यांशी भेट घेऊन अशा वाढत्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना व संबंधितांवर कारवाई करण्याचीही मागणी केली.
हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुप्रिया घरत यांची उरण पंचायत कार्यालयात काही प्रकरणांमध्ये सुनावणी सुरू होती. सुनावणी दरम्यान त्याठिकाणी हनुमान कोळीवाडा गावातील रहिवासी रविंद्र कोळी हे आले होते. रविंद्र कोळी यांनी ग्रामसेविका सुप्रिया घरत यांच्याशी विनाकारण वाद घातला. या वादातच त्यांनी ग्रामसेविका सुप्रिया घरत यांना सर्वांसमक्षच अश्लील भाषेत शिवीगाळ करुन धमकावले. याप्रकरणी ग्रामसेविका सुप्रिया घरत यांनी ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीनंतर उरण पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कामकाज करताना ग्रामसेवकांना नागरिकांकडून शिवीगाळ, मारहाण करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. यामुळे काम करताना ग्रामसेवकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
नागरिकांकडून अशा प्रकारे होणाऱ्या घटनांपासून सरंक्षण व्हावे व त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (१७);दुपारी उरण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उरण ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ग्रामसेवकांनी काळ्याफीती लाऊन निषेध व्यक्त केला.त्यानंतर त्यांनी विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांची भेट घेऊन कामकाज करताना ग्रामसेवकांना सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.