महाड : रायगड जिल्ह्यातील दक्षिण विभागातील तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात कामाचा खोळंबा झाला असून याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या विकासावर होत आहे.शासकीय स्तरावरील विविध योजना राबवण्यास ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका असते. जन्म - मृत्यूची नोंद, विवाह नोंदणी, घरटान उतारा, घरफाळा गावातील स्वच्छता व पाणीपुरवठ्याकडे लक्ष देणे, कर वसुली आदी महत्त्वाच्या नियमित कामांबरोबरच विविध ग्रामीण योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील ग्रामसेवकांचीच असते.तेराव्या वित्त आयोगातील विकासकामांच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे त्यांच्यावरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे.दक्षिण रायगडमधील सहा तालुक्यात ४४७ ग्रामपंचायती असून यामध्ये केवळ २६५ पदे मंजूर आहेत. यातही ४१ पदे रिक्त असल्याने एकेका ग्रामसेवकाला तीन ते चार ग्रामपंचायतींची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. महाड तालुक्यात तीन ग्रामसेवक निलंबित असून एक गैरहजर आहे तर श्रीवर्धन व माणगांव तालुक्यात प्रत्येकी एक ग्रामसेवक निलंबित आहे. महाड तालुक्यात १३४ ग्रामपंचायतींसाठी ८७ ग्रामसेवकांची पदे मंजूर आहेत तर १४ पदे रिक्त आहेत. म्हसळा तालुक्यात ४० पैकी २६ पदे मंजूर तर सात रिक्त आहेत. श्रीवर्धनमध्ये ४३ पैकी २८ पदे मंजूर असून १० पदे रिक्त आहेत. माणगांव तालुक्यात ७४ ग्रामपंचायतीत ६६ पदे मंजूर असून ४ रिक्त आहेत.
रायगडमध्ये ग्रामसेवकांची पदे रिक्त
By admin | Published: November 28, 2015 1:17 AM