ग्रामसेविकेने केला चार लाखांचा अपहार
By admin | Published: September 9, 2015 11:00 PM2015-09-09T23:00:17+5:302015-09-09T23:00:17+5:30
दादली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविके ने सरपंचाच्या बनावट सह्या करून बँकांमधील सुमारे चार लाख रुपयांची रक्कम काढून अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
महाड : दादली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविके ने सरपंचाच्या बनावट सह्या करून बँकांमधील सुमारे चार लाख रुपयांची रक्कम काढून अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मेघना भोसले असे या अपहार करणाऱ्या ग्रामसेविके चे नाव असून ती फरारी आहे. या प्रकरणी सरपंच सुवर्णा लाले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या ग्रामसेविकेच्या विरोधात वारंवार तक्रारी करूनही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी गावकीच्या सभेत केला. ग्रामसेविका भोसले यांना १८ आॅगस्टला जिल्हा परिषदेने निलंबित केल्यानंतर स्वत:च्या ताब्यातील धनादेशावर सरपंचाच्या बनावट सह्या करून बँकामधील या रकमा काढल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. दादली ग्रामपंचायतीची बचत खाती रायगड जि.म.सह. बँक आणि बडोदा बँकेच्या महाड शाखेत असून या खात्यामध्ये आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार सरपंच आणि ग्रामसेवकांना संयुक्त होते. ग्रामसेविका भोसले गेल्या वर्षभरापासून या ग्रामपंचायतीत कार्यरत असून तिच्या कार्यपद्धतीवर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ नाराज होते. बँकेच्या खातेपुस्तकांची वेळोवेळी मागणी करूनही सरपंचांनाही ती जुमानत नव्हती. या ग्रामसेविकेच्या विरोधात सरपंचांनी पंचायत समितीकडे तक्रारी करुन कारवाई करावी अशी मागणी केली होती.वर्षभरानंतर ग्रामसेविका मेघना भोसलेला १६ आॅगस्टला निलंबित केले.
ग्रामसेविकेला निलंबित केल्याबाबतची कोणतीही माहिती पंचायत समितीने दादली ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली नाही. असे असतानाही या ग्रामसेविकेने २२ आॅगस्टला बेकायदा ग्रामसभा बोलावली होती.
निलंबित ग्रामसेविका मेघना भोसले यांनी केलेल्या गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, अशा प्रकारच्या गैरव्यवहार करणाऱ्यांना पंचायत समिती व्यवस्थापन पाठीशी घालणार नाही.
-संघरत्ना खिलारे,
गटविकास अधिकारी, महाड