नातवासह आजीने गच्चीवरुन मारली उडी; धक्कादायक कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 07:30 IST2025-04-10T07:29:40+5:302025-04-10T07:30:07+5:30
उर्मिला यांनी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वेदांतला सोबत घेऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

नातवासह आजीने गच्चीवरुन मारली उडी; धक्कादायक कारण समोर
रोहा : एका ५२ वर्षीय महिलेने १ वर्षाच्या नातवाला सोबत घेऊन राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रोहा तालुक्यात बुधवारी सकाळी घडली. उर्मिला सिद्दीराम कोरे आणि वेदांत भोगडे, अशी मृत आजी आणि नातवाची नावे आहेत.
रोहा शहरातील दमखाडीजवळील परिसरात ओम चेम्बर्स बिल्डिंग या इमारतीत सिद्दीराम कोरे हे आपल्या कुटुंबीयांसह राहत असून, ते धाटाव एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करतात. त्यांच्या पत्नी उर्मिला यांना चार वर्षापासून मानसिक आजार जडला होता. त्यावर औषधोपचार सुरू होते; परंतु त्या औषधे वेळेवर घेत नसल्याने आजार बळावला होता. तर दुसरीकडे त्यांच्या एक वर्षाच्या नातवालाही 'ट्यूमर'चा त्रास असल्याने त्याला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात बुधवारी घेऊन जाणार होते. परंतु, उर्मिला यांनी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वेदांतला सोबत घेऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत उर्मिला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
... आणि नातवाचा उपचारापूर्वीच मृत्यू
या घटनेनंतर वेदांतची स्थिती नाजूक असल्याने त्याला पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृत उर्मिला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.