वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी; भेटीगाठीसोबतच मदतही आटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 11:05 PM2021-04-25T23:05:37+5:302021-04-25T23:05:42+5:30

कोरोना महामारीमुळे आप्तेष्ट आलेच नाहीत

Grandparents alone in the old age home; Along with the meeting, help also came | वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी; भेटीगाठीसोबतच मदतही आटली

वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी; भेटीगाठीसोबतच मदतही आटली

googlenewsNext

निखिल म्हात्रे

अलिबाग : अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर कार्लेखिंड येथे असलेल्या श्री समर्थ कृपा वृद्धधाम परहूरमध्ये अनेक वृद्ध आपल्या जीवनातील शेवटचे क्षण व्यतीत करीत आहेत. अनेक वृद्धांची आपल्या जवळच्या नातेवाइकांशी वर्षापासून भेटगाठ नसून, मुले व आप्तेष्ट वृद्धाश्रमाकडे फिरकले नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे, तसेच वृद्धाश्रमात मदतही आटल्याचे चित्र समोर आहे.

वृद्धाश्रमाला भेट दिली असता वृद्धाश्रमातील वृद्धांनी अश्रूंना वाट मोकळी करून आपली करुण कहाणी सांगण्यास सुरुवात केली. सोशल डिस्टन्सिंगमुळे बाहेरील व्यक्ती भेटत नसल्याने रोगापेक्षा उपाय भयंकर, असे म्हणण्याची वेळ आधीच विजनवासाचे चटके सोसत असलेल्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांवर आली आहे.

कोरोनाचे फंडे काहीही असो. आप्तांनीही पाठ फिरविलेल्या अनेक आश्रमांतील वृद्धांची अशीच माणूसभेटीसाठी घालमेल होत आहे, तर कोणताही निधी नसताना वृद्धाश्रम चालविणे जिकिरीचे झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी व संचारबंदी करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण जग थांबले. काहींना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. नागरिकांना आता संसार कसा चालवायचा, असा प्रश्न पडला होता. त्याचवेळी वृद्धाश्रम कसे चालवायचे, त्यामध्ये असलेल्या आजी-आजोबांचा कसा सांभाळ करायचा, असे विविध प्रश्न सतावत होते. मात्र, अशावेळी आयुष्यभराच्या जमा केलेल्या  ठेवी मोडून वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे संगोपन केले असल्याचे वृद्धाश्रम चालक ॲड. जयेंद्र गुंजाळ म्हणाले. 

आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढा देत असलेल्या ज्येष्ठांना या वयात धावपळ करणे शक्य होत नाही. मात्र, आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. कितीतरी वर्षांपूर्वीचे खटले आजही सुरूच असल्याने या सर्व गोष्टींमुळे त्यांना उतारवयातील मोठी दगदग सहन करावी लागते. यात त्यांना मोठा आर्थिक खर्चही सोसावा लागतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे खटले त्वरित निकाली काढावेत, असे ॲड. जयेंद्र गुंजाळ यांनी सांगितले.
 

Web Title: Grandparents alone in the old age home; Along with the meeting, help also came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड