माथेरान : येथील मुख्याधिकारी सागर घोलप यांच्यावर सोमवारी अविश्वास ठराव मंजूर झाला. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी विशेष सभा आयोजित करून एकमताने अविश्वास ठरावावर स्वाक्षऱ्या करून अविश्वास ठराव मंजूर केला. यासाठी विरोधी पक्षाच्या तिन्ही सदस्यांनी सहमती दर्शवली. यावेळी वीस सदस्यांपैकी एकूण एकोणीस सदस्यांनी केवळ अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी उपस्थिती दर्शवली. हा मंजूर करण्यात आलेला ठराव जिल्हाधिकºयांकडे देण्यासाठी सर्वच सदस्य अलिबागच्या मुख्य कार्यालयाकडे ताबडतोब रवाना झाले.अनेक कामे पूर्ण करण्यासाठी नेहमीच टाळाटाळ आणि असमर्थता दाखवून दिशाभूल करणारे हे एकमेव मुख्याधिकारी आहेत. सनियंत्रण समितीने सुध्दा त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी तसेच नगराध्यक्षांच्या अर्जाला देखील हे उत्तर देत नाहीत. नगरपरिषदेत पहिल्यांदाच असा प्रशासकीय अधिकाºयावर अविश्वास ठराव आणणे म्हणजे नगरपरिषदेसाठी काळा दिवस ठरला आहे हे सांगताना अतीव दु:ख होत असल्याचे नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी या महत्त्वपूर्ण विशेष सभेच्या वेळी नमूद केले.मुख्याधिकारी सागर घोलप हे खोटा आव आणून ३४३ कामांचा ठराव केला आहे असे जरी सांगत असले तरी प्रत्यक्षात एकाही कामासाठी वर्कआॅर्डर न देता स्वत:च्या मनानेच निविदांवर जाचक अटी व नियम टाकत आहेत. तसेच आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला कामे देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. दोन दोन वर्षे पूर्ण होऊन देखील कामांची बिले ठेकेदाराला अदा करण्यास घोलप अकार्यक्षम ठरले आहेत, यासाठी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणे आवश्यक आहे, असे विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.
सागर घोलप यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर, काम करण्यास असमर्थ असल्याने निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:04 AM