अलिबाग - रायगड जिल्ह्यात दरोडा, चोरी, घरफोडीच्या घटनांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. रायगड पोलीस विभागात गेली सहा वर्षात चोरीच्या 2 हजार 710 घटना घडल्या आहेत. त्यातील 1 हजार 395 चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलीसांना यश आले आहे. अलिबाग तालुक्यातील चौल दत्तमंदिर येथील चाळीस किलो चांदी चोरीच्या घटनेला एक वर्ष होऊन गेले तरी चोरीचा तपास लागलेला नाही. या गुन्ह्यातील आरोपी हे पोलीस रेकॉर्डवर नसलेले अर्थात सराईत गुन्हेगार नसण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.
रायगड पोलीस क्षेत्रात चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेली सहा वर्षात चोरीच्या घटनांचा आलेख खाली आलेला नाही. 2018 मध्ये 418 चोऱ्या झाल्या. त्यातील 192 चोऱ्यांचा तपास करण्यात पोलीसांना यश आले. 2019 मधील 489 चोऱ्यांपैकी 196 उघडकीस आल्या. 2020 मधील 388 चोऱ्यांपैकी 157 उघडकीस आल्या. 2021 मधील 407 चोऱ्यांपैकी 223 चोऱ्या पोलीसांनी उघडकीस आणल्या. 2022 मधील 473 चोऱ्यांपैकी 317 चोऱ्या पोलीसांनी उघडकीस आणल्या. 2023 मधील 472 चोऱ्यापैकी 310 चोऱ्या पोलीसांनी उघडकीस आणल्या. मागील वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये चोरीचे गुन्हे कमी झाले असून यावर्षी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 66 टक्के आहे.
मागील सहा वर्षात जिल्ह्यात घरफोडीच्या एकूण 1 हजार 11 घटना घडल्या आहेत. 2018 मधील 207 पैकी 94 घरफोड्या पोलीसांनी उघडकीस आणल्या. 2019 मधील 204 पैकी 82 घरफोड्या पोलीसांनी उघडकीस आणल्या. 2020 मधील 100 पैकी 40 घरफोड्या पोलीसांनी उघडकीस आणल्या. 2021 मधील 207 पैकी 94, 2022 मधील 164 पैकी 93, 2023 मधील 175 पैकी 100 घरफोड्या पोलीसांनी उघडकीस आणल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये घरफोडीचे गुन्हे कमी झाले असून यावर्षी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 57 टक्के आहे.
जबरी चोरीचे गेल्या सहा वर्षात 203 गुन्हे घडले आहेत. 2018 मधील 41 पैकी 33 जबरी चोऱ्या पोलीसांनी उघडकीस आणल्या. 2019 मधील 39 पैकी 25, 2020 मधील 20 पैकी 16, 2021 मधील 23 पैकी 19, 2022 मधील 36 पैकी 31, 2023 मधील 44 पैकी 41 जबरी चोऱ्या पोलीसांनी उघडकीस आणल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये जबरी चोरीचे गुन्हे वाढले आहेत. यावर्षी जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 93 टक्के आहे.
जिल्ह्यात दरोड्याच्या गेल्या सहा वर्षात 25 गुन्हे घडले आहेत. 2018 मधील 7 पैकी 7 दरोड्याचे गुन्हे पोलीसांनी उघडकीस आणले. 2019 मधील 4 पैकी 4, 2020 मधील 6 पैकी 6, 2021 मधील 1 पैकी 1, 2022 मधील 4 पैकी 3, 2023 मधील 3 पैकी 3 दरोड्याचे गुन्हे पोलीसांनी उघडकीस आणले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये दरोड्याचे गुन्हे कमी झाले असून यावर्षी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 100 टक्के आहे.
चौल दत्त मंदिर चोरीच्या तपासाचे आव्हानअलिबाग तालुक्यातील चाैल येथील दत्तमंदिरात एक वर्षापूर्वी चोरी झाली होती. मंदिरातील 40 किलो वजनाचा सुमारे 30 लाख रुपये किंमतीचा चांदीचा पत्रा चोरट्यांनी चोरी केला. हे चोरटे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले मात्र तरीही या चोरट्यांचा तपास पोलीसांना लागलेला नाही. सीसी टीव्हीतील एका चोरट्याच्या चेहऱ्यास मिळत्याजुळत्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका संशयितास यवतमाळ येथून अटक करून तपास करण्यात आला. मात्र अधिक तांत्रिक तपासात सदर संशयित हा या गुन्ह्यातील आरोपी म्हणून निष्पन्न होऊ शकलेला नाही. यातील आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील नसावेत अर्थात हे सराईत गुन्हेगार नसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रायगड पोलीसांपुढे या चोरीचा तपास एक आव्हान ठरले आहे.