मधुकर ठाकूर, उरण : द्रोणगिरी नोड सेक्टर १५ आणि फुंडे महाविद्यालयाच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेतील भुखंडावरील गवताला शनिवारी आग लागली.या आगीची झळ लागुन अनेक मॅन्ग्रोजची झाडे होरपळून निघाली आहेत.तर काही प्रमाणात पक्षांची घरटी, त्यांच्या वास्तव्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत.यामुळे बीपीसीएलच्या जेएनपीए बंदरापर्यत जाणाऱ्या वायु वाहिनीलाही धोका निर्माण झाल्याने अधिकाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती.
उरण -पनवेल रस्त्यावरील द्रोणगिरी नोड सेक्टर १५ आणि फुंडे महाविद्यालयाच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेतील भुखंडावरील गवताला शनिवारी (३) सुमारे बारा वाजताच्या सुमारास आग लागली. रखरखीत उन्हात वाळलेल्या गवताला लागलेल्या आगीला वाऱ्याची साथ लाभली.यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर धुराचे लोट आकाशात उंच उंच उडत होते.यामुळे या ठिकाणावरील मोकळ्या भूखंडावर असलेली मॅन्ग्रोज आणि इतर रानटी झाडे होरपळून निघाली.या विविध झाडांवर असलेली विविध पक्षांची घरटी आणि मॅन्ग्रोजची झाडे नष्ट झाली आहेत.या ठिकाणी असलेले शेकडो पक्षी आगीमुळे सैरावैरा पळत सुटले होते.
या मोकळ्या भूखंडाच्या जागेतून बीपीसीएलची १२ इंचाची एलपीजी वायुवाहीनी जेएनपीए बंदरापर्यत टाकण्यात आलेली आहे.अगदी ५० फुटांच्या अंतरावर लागलेल्या आगीमुळे वायुवाहीनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची चिन्हे दिसू लागली होती.याची खबर मिळताच बीपीसीएलचे अधिकारी आणि शेजारीच असलेल्या सिडकोच्या अग्नीशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.मात्र बीपीसीएलच्या वायुवाहीनीच्या उंचावर उच्च दाबाच्या वीजेच्या तारा असल्याने आगीवर पाणी मारणे धोकादायक ठरण्याची शक्यता होती.त्यामुळे सिडकोच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनीही संभाव्य धोका लक्षात घेऊन आग विझविण्यासाठी फारसे प्रयास केले नाहीत. मात्र या आगीमुळे जैवविविधता धोक्यात आली होती.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.