खाडीपट्ट्यात बहरली वाल, पावट्याच्या शेंगांची शेती
By admin | Published: January 23, 2017 05:44 AM2017-01-23T05:44:48+5:302017-01-23T05:44:48+5:30
पश्चिम महाराष्ट्रात हुरडा पार्टी प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे कोकणात पोपटीला महत्व आहे. तूर, मुग, पावटा तयार झाला की मुंबईसह
दासगाव : पश्चिम महाराष्ट्रात हुरडा पार्टी प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे कोकणात पोपटीला महत्व आहे. तूर, मुग, पावटा तयार झाला की मुंबईसह महाराष्ट्रातील खवय्ये कोकणात पोपटीसाठी येतात. पोपटीची ही चर्चा व्हॉटस्अॅप, फेसबुक सह सर्व प्रसिध्दी माध्यमांवर जोरात केली जाते. पोपटीची खरी चव कोकणात तयार झालेल्या गावठी शेंगांसोबत मिळते. महाड तालुक्यातील कडधान्याचे आगार समजल्या जाणाऱ्या खाडी पट्ट्यात मूग, वाल आणि पावट्याच्या शेंगा तयार होत असून पोपटीची पार्टी कधी सुरु होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासाठी बेत आखले जात आहेत.
महाड तालुक्यातील सावित्री नदी आणि खाडी किनाऱ्यांचा खाडी पट्टा हे कडधान्याचे आगार आहे. या भागात तुर, मूग, पावटा वाल आदी कडधान्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. खार वातावरण आणि चांगले पडलेले धुके यामुळे शेतीला मिळणार ओलावा कडधान्यासाठी पोषख आहे. यामुळे येथील कडधान्याची चव काही औरच आहे. आजकाल पोपटी चिकण आणि अंडीसहप्रसिध्द आहे. तरी पावटा, वाल, आणि तुरीच्या शेंगा मिळून लावलेली पोपटी हीच पोपटी मूळ आहे. गेली दोन महिन्यापासून पोपटीची पार्टी कशी करावयाची याची चर्चा सुरु आहे. मात्र या पोपटीसाठी पश्चीम महाराष्ट्रातून येणारा वाल पावटा सध्या वापरला जात आहे. महाड तालुक्यातील गावठी तूर, मूग पावटा आता बाजारात येण्यासाठी तयार झाला असल्याने याच्या वेगळया चर्चा सुरु झाल्या आहेत.
भांबरुटीमुळे पोपटीला वेगळी चव येते. शेताच्या बांधावर भांबरुट नावाची एक वनस्पती उगवते या वनस्पत्ीला ओव्याचा वास येतो. गोल आणि गादीदार मखमली काट्याने भरलेले पान आणि पिवळया रंगाची फुले अशी ही वनस्पती कोकणातील शेताच्या बांधावर नैसर्गीकरित्या उगवते. औषधी गुणधर्म असणारी ही वनस्पती सकाळी पडणाऱ्या धुक्याच्या ओलाव्यातील पाणी शोशुन जगते. कोकणातील पोपटीमध्ये इतर पदार्थांन ऐवजी भाबरुंटीच्या पानाला अधिक महत्व दिले जाते. पावट्याचा खमंग सुगंध आणि भांबरुटीचा ओव्यासारख्या स्वाद कोकणातील पोपटीची लज्जत वाढवते. (वार्ताहर)