बिरवाडी : उन्हाळ्याची धग दिवसेंदिवस वाढत जात असताना जंगलातील पशूपक्ष्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पना आपल्याला येत असेल. महाड तालुक्यातील भिवघर गावातील तरुणांनी मात्र या प्रश्नांवर गेली अनेक वर्षे सातत्याने काम सुरूच ठेवले आहे. आपल्या गावात वणवा पेटू न देणाऱ्या भिवघरचे किशोर पवार अनेक लहान-थोर ग्रामस्थ सध्या जंगलात पाण्याचे नैसर्गिक कुंभ भरत आहेत. पाणीटंचाईची झळ ग्रामीण भागातील लोकवस्तीला बसत असल्याने ही बाब लक्षात घेऊन जंगल परिसरातील पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत उपलब्ध राहावा, याकरिता कृत्रिमरीत्या पाणी उपलब्ध करून देण्याचा निसर्गप्रेमी तरुणांकडून प्रयत्न सुरू आहे.‘पर्यावरणासाठी एक धाव’ अशा पद्धतीचे उपक्रम राबवून सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीसोबतच ही चळवळ फक्त कागदावरती न ठेवता गेली सात वर्षे सातत्याने आपल्या गावात वणवा रोखणारे भिवघरचे किशोर पवार आणि वनप्रेमी मंडळाच्या सर्व सदस्यांनी यंदाही जंगलातील पशूपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात गुंग आहेत. जंगलातील नैसर्गिक पाणी साठवण्याच्या जागा सध्या कोरडे झाल्याने त्यात गावातून कॅनमधून पाणी नेऊन ते भरून ठेवण्याचे काम गेले महिनाभर सुरू आहे. गावात येणारा वणवा रोखल्याने गेल्या सात वर्षांत या भिवघरच्या जंगलात मोरासह अनेक पक्षी आणि माकडे, भेकरासह अनेक वन्यजीव वाढले आहेत; पण उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष झाल्याने त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे आपले पहिले कर्तव्य समजून भिवघरचे ग्रामस्थ हे काम करीत आहेत. आपले जंगल वाचवून वाढणाºया वन्यजीवांची काळजी घेण्यात भिवघरचे ग्रामस्थ गुंग असल्याने तालुक्यात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.महाड तालुक्यातील जंगल परिसरामध्ये शिकाऱ्यांनी लावलेल्या तारांच्या सापळ्यामध्ये अडकून बिबट्या मृत्युमुखी पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत, तसेच कोळसा निर्मितीकरिता वणवा लावून जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत, अशा परिस्थितीत निसर्गप्रेमी संस्थांकडून प्राण्यांकरिता कृत्रिम पाणीसाठे उपलब्ध करून वणवामुक्त अभियान राबवून जंगल संवर्धनासाठी टाकले जाणारे पाऊल पर्यावरणासाठी लाभदायक ठरणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
तहानलेल्या प्राण्यांसाठी भिवघरच्या तरुणांची धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 2:03 AM