सुधागडमध्ये रब्बी क्षेत्रात मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:36 AM2018-05-24T02:36:19+5:302018-05-24T02:36:19+5:30
शेतकरी सुखावले : जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे सिंचनाचे क्षेत्रही वाढले
राबगाव /पाली : सुधागड तालुक्यात जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. जलस्रोत वाढल्यामुळे रब्बी पिकाखालील क्षेत्र ३०० हेक्टरने वाढले असल्याचे कृषी अधिकारी अनिल रोकडे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरीराजाही सुखावला आहे. महागाव येथील कवेळे या ५०० लोकवस्ती असलेल्या आदिवासी वाडीवर १७.५० लाखांची नळ योजना कार्यान्वित झाली आहे. आरसीएफ कंपनी, आमदार धैर्यशील पाटील, जि. प. सदस्य सुरेश खैरे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप लाला, ग्रामस्थ भालचंद्र पार्टे यांच्या मदतीने ही योजना सुरू झाली आहे. या ठिकाणी सौरऊर्जेवर पाणीपुरवठा करण्यासाठी चाचणी सुरू आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता डी. जी. डवले यांनी सांगितले.
राष्ट्रीय पेयजलची कामे सफल
राष्ट्रीय पेयजल योजनेतून पूर्ण झालेल्या कामांमुळे काही गावे व आदिवासी वाड्यांचा पाणीप्रश्न मिटला आहे. शरदवाडी, गौळमाळ धनगरवाडी, गौळमाळ ठाकूरवाडी, चंदरगाव, चव्हाणवाडी अशा अनेक ठिकाणी या योजनेतून झालेल्या कामांमुळे पाणीप्रश्न मिटला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत कोंडप व गोमाची वाडीमध्ये नळ पाणीपुरवठा योजना नुकतीच सुरू झाली आहे.
टँकरची मागणी नाही
सुधागड तालुक्यात या वर्षी अजून कुठूनही टँकरची मागणी आलेली नाही. मागील वर्षी फक्त आपटवणे या एकाच गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. या वर्षीच्या टंचाई कृती आराखड्यात चार गावे व १० वाड्यांचा समावेश टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आला आहे. महागाव ग्रामपंचायतीमार्फत मात्र ग्रामस्थांच्या सोईसाठी भोप्याच्या वाडीला टँकरने पाणीपुरवठा केला गेला आहे.
विंधण विहिरींची कामे
टंचाई कृती आराखड्यात १५ गावे व १७ वाड्यांचा समावेश विंधण विहिरी घेण्यासाठी करण्यात आला आहे. त्यातील १५ विंधण विहिरींना मंजुरी मिळाली असून ७ विंधण विहिरी घेण्यासाठी प्रपत्र भरण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १० ठिकाणी विंधण विहिरी घेण्यात आल्या आहेत. यातील नाणोसे चांभारवाडा, कालकाईवाडी व केळगणी ठाकूरवाडी येथील विंधण विहिरींना पाणी लागले नाही. आणखी पाच ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यात येणार आहेत.
खोदण्याचे युनिट नाही
शासनाकडे स्वत:चे विंधण विहीर खोदण्याचे युनिट नाही. एकदा विंधण विहीर कोरडी गेल्यास पुन्हा त्या ठिकाणी ती घेतली जात नाही. परिणामी ते गाव किंवा वाडी विंधण विहिरीशिवाय राहते. शासनाकडून अत्यंत कमी पैसे (बाजारभावाच्या निम्मे) मिळत असल्याने विंधण विहिरी खोदण्यासाठी ठेकेदार तयार होत नाहीत.
जनावरांची सोय
तालुक्यातील अनेक जलाशयांत पुरेसा पाणीसाठा असल्याने जनावरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत नाही. ही जनावरे मोठ्या प्रमाणात नदी, तलाव, डबके, डवरे अशा ठिकाणी जमलेली दिसतात.
अडुळसे गाव, वाड्यांना दिलासा
अडुळसे गावाला वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते; मात्र नुकतीच तेथे नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने पाणीप्रश्न सुटला आहे. या ग्रामपंचायत हद्दीत सहा वाड्यांचा पाणीप्रश्नही सोडविण्यात आला आहे, असे माजी उपसरपंच संतोष बावधने यांनी सांगितले. मागील वर्षी शरदवाडीवर १२ लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना सुरू झाली आहे.
पालीत शुद्ध पाण्याची वानवा
पाली गावात अजूनही शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पाली गावाची कोट्यवधी रुपये खर्चाची शुद्ध पाणीपुरवठा योजना लालफितीत अडकली आहे. पाली गावास अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो. या नदीला सध्या मुबलक पाणी आहे; परंतु ते शुद्ध न करताच पालीकरांना पुरविले जाते. त्यामुळे अनेक नागरिक शुद्ध पाण्यासाठी विहिरींवर धाव घेतात. पालीत १९७० मध्ये केवळ ७०० कुटुंबांसाठी केलेली नळ पाणीपुरवठा योजनाच अजूनही सुरू आहे. या योजनेत काही बदल केले असले, तरी जुनी जलवाहिनी फुटल्याने पाणीगळती मोठ्या प्रमाणावर होते. सरकारच्या २००८-०९ च्या सर्वेक्षणानुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळ पाणीपुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण सात कोटी ७९ लाखांचा निधी व १० टक्के लोकवर्गणीद्वारा ही योजना उभी राहणार होती; परंतु राजकीय श्रेयवादामध्ये ती रखडली. त्याबरोबर १० टक्के लोकवर्गणीचा प्रश्नही होताच. नुकताच पालीला ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. शुद्ध नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी ७० लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथिल करण्यात आली आहे. या योजनेचे काम सुरू झाले तरी ती पूर्णत्वास जाण्यासाठी २ ते ३ वर्षे जातील. तोवर पालीकरांना शुद्ध पाण्यासाठी थांबावे लागणार आहे.
दर्यागावमध्ये काम सुरू
दर्यागावला सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. परिणामी आता दर्यागावला राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळ योजना व विहीर दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत; मात्र अजूनही दर्यागाव, आतोणे आदिवासी वाडी, भोप्याची वाडी, कोंडी धनगरवाडी, आपटवणे गाव आदी ठिकाणी पाणीटंचाई आहे.
धरणे प्रलंबित
२५ ते ३० वर्षांपासून दर्यागाव (पाच्छापूर) व खांडपोली येथील धरणे प्रलंबित आहेत. सरकारच्या उदासीन धोरणामुळे ही महत्त्वाची धरणे आजतागायत कागदावरच आहेत. ती व्हावीत यासाठी सामाजिक कार्यकर्ते आरिफ मनियार यांनी दोन वेळा उपोषण केले होते. या धरणांमुळे तालुक्यातील पाणीटंचाई दूर होईल.
फार्म हाउसला वळले पाणी
डोंगर-दºया व निसर्गसौंदर्यामुळे सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी फार्म हाउस उभी राहिली आहेत. त्या जागेत मोठ्या प्रमाणात बेकायदा बोअरवेल खोदल्या आहेत. काहींनी मोटर लावून नदीचे पाणी उपसून फार्म हाउसवर आणले आहे. त्यामुळे शेजारी असलेल्या गावांच्या विहिरींचे पाणी, तसेच भूजल पातळी घटत आहे. गावकºयांच्या हक्काचे नदीचे पाणी फार्म हाउसला जात असल्याने मेअखेरीस पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.