मुशेत नदीवरील नव्या पुलाला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 04:32 AM2018-09-20T04:32:30+5:302018-09-20T04:32:48+5:30
एक कोटी २२ लाखांचा निधी मंजूर; ७० वर्षे जुना पूल मोडकळीस आल्याने नवीन प्रस्ताव
अलिबाग : तालुक्यातील मुशेत नदीवर नव्याने पूल बांधण्याला सरकारने हिरवा कंदील दिला आहे. पुलासाठी तब्बल एक कोटी २२ लाख ५० हजार रुपये मंजूरही केले आहेत. ७० वर्षे जुन्या पुलाच्या जागी आता लवकरच नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पुलावरून प्रवास करताना आता जीव मुठीत घेऊन जावे लागणार नाही.
मुशेत पूल पूर्णपणे मोडकळीस आला असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, तसेच या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हा पूल नादुरुस्त असल्याने या पुलावरून अलिबाग, रेवस तसेच बेलवली, बहिरोळे, मापगाव, कनकेश्वर देवस्थान, मुशेत आणि कार्लेखिंडीकडे जाणारी वाहने जीव मुठीत धरून प्रवास करतात. ग्रामीण भागाची नाळ अलिबाग शहराला जोडण्याचे महत्त्वाचे काम या पुलाचे आहे. मात्र, पुलाची दयनीय अवस्था झाल्याने तेथे नव्याने पुलाची उभारणी करणे आवश्यक झाले होते. याबाबत काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सरकारकडे मागणी केली होती. त्यांनी त्याबाबतचे पत्र १६ आॅगस्ट २०१८ रोजी दिले होते. अलिबाग शहराकडे येणाऱ्या ग्रामीण जनतेसाठी हा महत्त्वाचा पूल आहे. त्यामुळे या पुलाची नव्याने निर्मिती व्हावी, यासाठी २००५ सालापासून प्रयत्न सुरू होते, अशी माहिती माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी दिली.
नागरिक सातत्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. एखादा अपघात झाल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. ही गंभीर बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने १२ सप्टेंबर २०१८ च्या निर्णयाने या पुलासाठी एक कोटी २२ लाख ५० हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळेही जिल्ह्यातील सर्व पुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारने सर्वच जुन्या पुलांचे स्ट्रक्टरल आॅडिट करण्याचे आदेश दिले होते.
या पुलाचे काम ७० वर्षांपूर्वी झाले आहे. २०१३ च्या मुसळधार पावसामध्ये या पुलाचे एका बाजूकडील दगडी बांधकाम असलेला काही भाग कोसळला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीही काही ठिकाणचा भाग कमी-अधिक प्रमाणात ढासळतच होता. या धोकादायक झालेल्या पुलामुळे एक वाहनचालक वाहून गेले होते; परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. सर्व गंभीर परिस्थिती पाहता रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुशेत नदीवरील पूल पूर्णपणे नादुरुस्त झाला असल्याने नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी विनंती ठाकूर यांनी सरकारकडे पुन्हा केली होती.