नेरळ : कर्जत तालुक्यातील मानिवली येथे ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनानिमित्त मानिवली येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ९ आॅगस्ट क्रांतिदिनानिमित्त सकाळी १० वाजता मानिवली येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नेरळ हुतात्मा चौकातही नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच व अन्य मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.९ आॅगस्ट क्रांतिदिनानिमित्त पंचायत समिती कर्जत, ग्रुप ग्रामपंचायत मानिवली, हुतात्मा स्मारक समिती मानिवली व केंद्र दहिवली मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानिवली गावातील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात क्रांतिदिनी अभिवादन करणात आले होते. प्रथमत: मानिवली गावचे सुपुत्र वीर हिराजी गोमाजी पाटील, वीर भाई कोतवाल, शहीद भगत मास्तर या क्रांतिवीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच स्मारकातील प्रतिमांना पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. त्यानंतर आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कर्जत पंचायत समितीचे सभापती राहुल विशे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश पाटील आदींसह हुतात्म्यांचे नातेवाईक, ग्रामसेवक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी आदी या वेळी उपस्थित होते.कर्जतमध्ये क्रांतिज्योत फेरीकर्जत : क्रांतिदिनानिमित्त कर्जतमधील शारदा मंदिर शाळेच्या वतीने क्रांतिज्योत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध कार्यक्रम पार पडले. शाळेच्या मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरिता देशमुख यांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योत प्रज्वलित करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित भाषण व पोवाडे सादर केले. विद्यार्थी, शिक्षक यांनी कर्जत शहरातून क्रांतिज्योत फेरी काढली. ही फेरी आमराई येथील हुतात्मा स्मृतिस्तंभ जवळ गेली. याप्रसंगी अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशन ट्रस्टचे सचिव नंदकुमार मणेर यांनी क्रांतिस्मारकालापुष्पहार अर्पण करून क्रांतिकारकांच्या स्मृतीस अभिवादन केले.मुरुडमध्ये राष्ट्रवीरांना सलामीमुरुड : स्वातंत्र्य संग्रामात जे नरवीर जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधी लढले. ब्रिटिशांविरुद्ध कडवी झुंज घेत रक्तधन बलिवेदीवर प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे जंजिरा विद्यामंडळ संचलित सर एस. ए. हायस्कूल, मुरुडच्या विद्यार्थ्यांनी मुरुड येथील क्रांतिस्तंभावर संचलन करीत क्रांतिवीर शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सावरकर, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू आदी राष्ट्रभक्तांना सलामी दिली आणि भारतमातेचा जयजयकार केला. या वेळी मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, पर्यटन व नियोजन समिती सभापती पी. के. आरेकर, मुख्याध्यापक ए. के. थोरवे, उपमुख्याध्यापक दिनकर पाटील, पर्यवेक्षक रमेश मोरे व शिक्षकवृंद उपस्थित होते. सर एस. ए. विद्यालयात इयत्ता दुसरी ते बारावीच्या २३ विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या शौर्यकथेतून त्यांची जीवनगाथा कथन करून वक्तृत्व स्पर्धा यशस्वी केली.
मानिवलीत हुतात्म्यांना अभिवादन; क्रांतिदिनी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 10:57 PM