रायगडमध्ये हुतात्म्यांना अभिवादन; सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:32 AM2020-01-03T00:32:20+5:302020-01-03T00:32:28+5:30
कर्जत तालुक्यातील हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढताना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली.
नेरळ : कर्जत तालुक्यातील हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढताना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली. या घटनेच्या ७७ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी १ आणि २ जानेवारी रोजी मानिवली येथे हुतात्मांना अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा वीरभाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचा ७७ वा स्मृतिदिन गुरुवार, २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती कर्जत, ग्रुप ग्रामपंचायत मानिवली, हुतात्मा स्मारक समिती व केंद्र दहिवली- मालेगाव यांच्या विद्यमाने मानिवली येथील स्मारकाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वीर हुतात्मा वीरभाई कोतवाल, हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच १ जानेवारी रोजी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पुण्यभूमीतून ज्योत पेटवून ही मशाल संपूर्ण मानिवली गावात फिरून गावातील तरुण मशाल घेऊन सिद्धगडावर जातात. २ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. तसेच मानिवली येथील हुतात्मा स्मारकात खांडस बिट विभागातील शाळांनी जागर क्रांतीच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते सादर करून हुतात्म्यांना अभिवादन केले. या वेळी पाटोदा तालुक्यातील सरपंच भास्करराव पेरेपाटील यांना हुतात्मा हिराजी पाटील गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती नारायण डामसे, जिल्हा परिषद सदस्या सहारा कोळंबे आदी उपस्थित होते.
हुतात्मा भाई कोतवाल यांना अभिवादन
म्हसळा : हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची पुण्यतिथी म्हसळा नाभिक समाजाचे शहराध्यक्ष महेश खराडे यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली. तालुक्याचे माजी अध्यक्ष विलास यादव, दिलीप जाधव, दत्तात्रेय जाधव, नथुराम पवार, राजेंद्र बडे, सुशील यादव, मंगेश कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाभिक समाजाचे माजी तालुका अध्यक्ष विलास यादव गुरुजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो प्रतिमेस अभिवादन केले.
माथेरानमध्ये आदरांजली
माथेरान : माथेरानचे भूमिपुत्र वीर हुतात्मा भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची पाने सुवर्णाक्षरांनी लिहिली होती, त्यांच्या या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त २ जानेवारी रोजी येथील नौरोजी उद्यानात आदरांजली वाहण्यात आली.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी १०५ वीरांनी आपले बलिदान दिले होते, त्यातील एक म्हणजे माथेरानचे वीर सुपुत्र हुतात्मा अण्णासाहेब उर्फ भाई कोतवाल त्यांच्या कार्याची अन् देशसेवेची महती युवा पिढीला ज्ञात व्हावी, यासाठी २ जानेवारी या दिवशी मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे हौतात्म्य पत्करलेल्या माथेरानच्या हुतात्मा भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे ५.३० वाजता गावातून मशाल फेरी काढण्यात आली, त्यानंतर ६.०२ वाजता नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्यज्योत प्रज्वलित केली.