सावित्रीबाई फुले यांना अभिवादन; जिल्ह्यात जयंतीनिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:40 AM2020-01-04T00:40:02+5:302020-01-04T00:40:05+5:30
ठिकठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी काढली रॅली
म्हसळा : येथील कोकण उन्नती मित्रमंडळ संचलित वसंतराव नाईक आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले महाविद्यालयात सांस्कृतिक विभागांतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती साजरी करण्यात आली. क्रांतिज्योतीच्या उत्सव सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. एन. राघवराव, महाविद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचे सदस्य धर्मा पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी अर्चना येलवे हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा परिचय करून देताना ‘डिजिटल युगातील स्री शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त के ले. अमानुष रूढी परंपरा व कर्मकांडामध्ये अडकलेल्या समाजात शिक्षण प्रसाराचे कार्य करताना सावित्रीबार्इंना आलेल्या अडचणी, झालेले त्रास आणि अपमान या विषयावर माहिती देताना सावित्रीबार्इंच्या या कार्यात ज्योतिबांनी केलेले सहकार्य याबाबतही उदाहरणे दिली. आजच्या या डिजिटल युगात स्रियांनी केवळ प्रसारमाध्यमातून दाखविल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये अडकून राहू नये, तर परंपरागत विद्यापीठात किंवा मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन उच्चविद्या विभूषित होणे आणि आजच्या डिजिटल युगाला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी अर्थसाक्षर आणि डिजिटल साक्षर होणेही गरजेचे आहे; त्यासाठी प्रत्येक स्रीने गुगल, यूट्युब याचा वापर करून संगणक साक्षर होणे गरजेचे आहे, असे सांगितले.
खोपोली शहरामध्ये रॅलीचे आयोजन
वावोशी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खोपोली शहरातील स्वामींनी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांनी कानसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खोपोली शहरातील असंख्य महिला या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक पोशाख घालून हजर
होत्या. यासोबत प्राध्यापक शीतल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केएमसी महाविद्यालयातील मुलींनी या कार्यक्रमात पारंपरिक वेश परिधान करून आपला सहभाग नोंदवला होता. रॅलीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रावर स्फूर्तिदायी गीते सादर के ली.
डिकसळमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नेरळ : कर्जत तालुक्यातील डिकसळ शांतीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात, रमाबाई महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून बुद्धपूजा घेण्यात आली. या वेळी भारतीय बौद्धमहासभेच्या हिराताई हिरे, शारदा वाघमारे, पुष्पलता गायकवाड, नंदा हिरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
कर्जत नगरपरिषदेत अभिवादन
कर्जत: स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, महिलांना स्वावलंबनाचा महामंत्र देणाºया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी नगरसेविका स्वामिनी मांजरे, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, संचिता पाटील, वैशाली मोरे, प्राची डेरवणकर आदीसह अरविंद नातू, अशोक भालेराव, सुरेश खैरे, कल्याणी लोखंडे आदी कर्मचारी उपस्थित होते. कल्याणी लोखंडे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली.
गीतामधून उलगडला जीवनपट
कर्जत : दुर्गम भागातील जांबरुंग येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या खैरमाता माध्यमिक शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक रमेश पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. आहारतज्ज्ञ रेश्मा नाकटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
वंदना बांगरी आणि रसिका गायकवाड या विद्यार्थिनींनी गीत सादर करून सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट सादर केला. रेश्मा नाकटे यांनी सावित्रीबार्इंच्या कार्याची माहिती सांगून, त्या होत्या म्हणूनच आपण महिला शिक्षित होत आहोत, अन्यथा चूल आणि मूल यापलीकडे आपण गेलो नसतो, असे सांगितले.