हिमालयातील ग्रिफोन गिधाडांचा कोकणात वावर; वन्यजीव अभ्यासकांची श्रीवर्धन तालुक्यात केली नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 05:23 AM2020-01-29T05:23:50+5:302020-01-29T05:24:01+5:30
कोकणामध्ये हिमालयातील या गिधांडांची नोंद हा फार दुर्मीळ योग आहे.
माणगाव : हिमालयातील उच्च प्रदेशात आढळून येणाऱ्या हिमालयीन ग्रिफोन गिधाडांची नोंद २६ जानेवारी २०२० रोजी माणगाव येथील वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे केली आहे. हिमालयात आढळून येणारे सर्वात मोठे आणि वजनदार गिधाड म्हणून आकाराने प्रचंड असलेल्या हिमालयीन गिधाडांची ओळख माळढोक पक्ष्यानंतर भारतातील दुसरा सर्वात मोठा पक्षी अशी आहे.
कोकणामध्ये हिमालयातील या गिधांडांची नोंद हा फार दुर्मीळ योग आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या दशकात गिधाडांचे संवर्धन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे अलीकडेच लुप्त होत चाललेल्या पांढरपाठी गिधाड आणि भारतीय गिधाडांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, त्यामुळे रायगडमध्ये गिधाडांसाठी चांगले पोषक वातावरण असल्याने बाहेरून इतर गिधाडांच्या प्रजातीदेखील येथे दाखल झालेल्या पाहावयास मिळत असल्याचे शंतनू कुवेसकर यांनी सांगितले आहे.
आपल्या पर्यावरणात गिधाडे नैसर्गिक सफाई कर्मचारी म्हणून फार मोठी व महत्त्वाची भूमिका बजावत असतात. महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यामध्ये वनखात्याने राबविलेल्या गिधाड संवर्धन योजनांना या आधीच चांगले यश मिळाले आहे. हिमालयातील ग्रिफोन गिधाडांची कोकणातील या पट्ट्यामध्ये नोंद म्हणजे फार दुर्मीळ योग असून, पर्यावरण अभ्यासकांमध्ये मोठा कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे.
श्रीवर्धनमध्ये सात गिधाडे
- पांढरपाठी आणि भारतीय गिधाडांसोबत एकूण सात हिमालय गिधाडे श्रीवर्धन येथे दिसून आली आहेत. जगातील सर्वात उंच पर्वतरांगांपैकी मध्य आशियामधील पामीर पर्वतरांग, काझाखस्तान, तिबेटी पठार आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये या गिधाड प्रजातीचे मुख्य वास्तव्य आहे, थंडीच्या मोसमात उत्तर भारतातील काही पट्ट्यात ही गिधाडे दाखल होतात.