किराणा, औषध विक्रेते निघाले गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:26 AM2020-06-10T00:26:23+5:302020-06-10T00:26:34+5:30
परप्रांतीय व्यावसायिकांचे स्थलांतर
नवी मुंबई : लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल होताच किराणा आणि औषध विक्रेत्यांनीही गावचा रस्ता धरला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अविरत खुली असलेली औषध आणि किराणा विक्रीची अनेक भागोतील दुकाने बंद दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पर्यायी दुकानाचा शोध घ्यावा लागत आहे. पुढील दोन-तीन महिने गावी गेलेले विक्रेते परत येण्याची शक्यता नाही.
नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात जवळपास ६५0 औषधाची दुकाने आहेत. तर किराणा मालाच्या दुकानांची संख्या पाच हजारांच्या घरात आहे. अत्यावश्यक औषधांसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांना स्थानिक स्तरावर असलेल्या याच दुकानांवर अवलंबून राहावे लागते. लॉकडाऊनच्या काळात गल्लीबोळात थाटलेल्या या दुकानांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शहरात असलेल्या एकूण औषध विक्रीच्या दुकानांपैकी सरासरी ४0 टक्के दुकाने राजस्थानी चालवतात. तर किराणामालाच्या ९0 टक्के दुकानांची मालकी राजस्थानी व इतर प्रांतीय लोकांकडे आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांनी अगोदरच स्थलांतर केले आहे. तर विक्रेत्यांनीही दुकाने बंद करून गावाचा रस्ता धरला आहे. परिणामी लॉकडाऊनमध्ये उपयुक्त ठरलेल्या विविध भागांतील औषध आणि किराणामालाच्या दुकानांना सध्या टाळे लागल्याचे दिसत आहे.
मिशन बिगिन अगेन अंतर्गत सोमवारपासून शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याने शहराच्या बहुतांशी भागातील व्यवहार सुरू झाले आहेत. परंतु अनेक भागांतील मेडिकल्स आणि अन्नधान्याच्या विक्रीची दुकाने बंद असल्याने
स्थानिक रहिवाशांना खरेदीसाठी दूरच्या पर्यायाचा अवलंब करावा लागत आहे.
दुकाने बंद करू नये
च्औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून मेडिकल्सची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देेश राज्य सरकारने दिले. या काळात शक्यतो कोणीही दुकाने बंद ठेवू नये, असे संघटनेने आवाहन केले आहे. तरी काही विक्रेते दुकाने बंद करून गावी जात असतील तर त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात, असे नवी मुंबई रिटेल केमिस्ट अॅण्ड होलसेलर्स असोसिएशनचे सचिव सुनील छाजेड यांनी स्पष्ट केले आहे.