- प्रकाश कदम पोलादपूर : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरु वात केली आहे. पाणीटंचाईची भीषणता वाढल्याने पोलादपूर तालुक्यातील दहा गावे आणि ३५ वाड्यांना टंचाईची झळ बसत असल्याने नागरिकांची तहान भागवण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रशासनाने चार टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. एकूण ६५ वाड्या व गावे यांचे प्रस्ताव पोलादपूर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे आले असून, ४५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. चार टँकरने सुरळीत पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.तापमान वाढल्याने तालुक्यातील नदीपात्र कोरडे झाले आहेत. ढवळी, कामथी, घोडवळी, सावित्री या मुख्य नद्या पावसाच्या हंगामात दुथडी भरून वाहत असतात, तर उन्हाळ्यात नद्यांची पात्र ओस पडत असल्याने, त्याचप्रमाणे साठवण टाक्या, कूपनलिका याची अवस्था असून नसल्यासारखी झाल्याने तालुक्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो. मात्र, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात मोठी धरणे निर्माण करण्यात सरकार आणि प्रशासनाला अपयश आले आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या धरणांची योग्य ती डागडुजी करण्यात न आल्यानेही पाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे प्रलंबित धरणाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.टंचाईग्रस्त गाव-वाड्याचांभारगणी बु., ओंबळी तामसडे, गोळेगणी गावठाण, तुटवली, साडेकोंड, किनेश्वर गावठाण, कुंभळवने, कालवलीतील कापडे खुर्द राखेचाकोंड, परसुळे, किनेश्वरवाडी, ओंबळी धनगरवाडी, कुडपण शेलारवाडी आदींचा सामावेश आहे.महामार्गालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाईमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात काही विहिरी बाधित झाल्या असल्याने, त्याच विहिरींचे पुनर्वसन गावाजवळ किंवा मुख्य विहिरीच्या आसपास करणे गरजेचे आहे. महाड तालुक्यातील महामार्गालगत वसलेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, त्याचप्रमाणे किल्ले रायगडच्या पायथाशी असलेल्या गावांना पाणीटंचाई भासत असून, महिलांसह ग्रामस्थ दूरवरून पाणी आणत असल्याचे चित्र दिसत आहे.
पोलादपूर तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:51 AM