रस्त्यासाठी अधिकाऱ्यांना घातला घेराव
By admin | Published: November 21, 2015 12:44 AM2015-11-21T00:44:46+5:302015-11-21T00:44:46+5:30
रोहे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी अलिबाग काँग्रेसने शुक्रवारी अलिबाग कार्यकारी अभियंत्याला घेराव घातला. काम सुरू होत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना
अलिबाग : रोहे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी अलिबाग काँग्रेसने शुक्रवारी अलिबाग कार्यकारी अभियंत्याला घेराव घातला. काम सुरू होत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना खुर्चीतून बाहेर पडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
येत्या आठ दिवसांत तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश अलिबाग कार्यकारी अभियंता विलास कांबळे यांना कोकण भुवन येथील अधीक्षक अभियंता मोहिते यांनी दिले. कायम सत्तेमध्ये राहिलेल्या काँग्रेसने आता विरोधात राहून जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. अलिबाग- रोहे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ४८ तासांमध्ये या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा घेराव घालण्यात येईल, असा इशारा अलिबाग काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र कामाला सुरुवात झाली नव्हती.
रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी अलिबागच्या बांधकाम विभागाला ४८ तासांची दिलेली मुदत शुक्रवारी संपल्याने सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला घेराव घालण्यात आल्याचे अलिबाग तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सकाळीच कार्यालयावर धडक दिल्याने बांधकाम खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच भांबावून गेले. अचानक मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते आल्याने पोलिसांनाही पाचारण करावे लागले. पोलीस आले तरी कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. आधी रस्त्यांच्या कामांना सुरुवात करा, त्यानंतरच कार्यकारी अभियंता विलास कांबळे आणि उपअभियंता दिलीप विडेकर यांना घातलेला घेराव काढण्यात येईल, असा पवित्रा घेतल्याने वातावरण अजूनच चिघळले. अधीक्षक अभियंता मोहिते यांनी येत्या आठ दिवसात कामे पूर्ण करा असे आदेश कांबळे यांना दिले. येत्या आठ दिवसांमध्ये कामे पूर्ण न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा अनंत गोंधळी यांनी दिला. (प्रतिनिधी)