शेतात कडधान्य, तृणधान्य पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 06:02 AM2022-07-30T06:02:28+5:302022-07-30T06:02:57+5:30
उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : राज्यातील उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाने तृणधान्य आणि कडधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना मिळावे, पीक उत्पादनात वाढ व्हावी, तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने तृणधान्य व कडधान्य पिकांची राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा तालुका पातळी, जिल्हा पातळी, विभाग व राज्य पातळी या स्तरांवर आयोजित केली आहे. स्पर्धेत विजयी शेतकऱ्यांना रोख बक्षीसही दिले जाणार आहे.
या पिकांचा समावेश
भात, ज्वारी, बाजरी, मका, नागली, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल ही पिके खरिपात, तर ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या पिकांसाठी रब्बीत पीक स्पर्धा होईल.
पीक स्पर्धेत भाग कसा घ्याल?
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान १० गुंठे लागवड क्षेत्र असावे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीचा सात बारा, आठ अ, आदिवासी बांधवांनी जातीचा दाखला देणे आवश्यक आहे. पीकनिहाय प्रत्येकी ३०० रुपये स्पर्धेचे प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.
स्पर्धेसाठी निकष
तालुका कृषी अधिकारी या स्पर्धांचे आयोजन करतील. त्यासाठी शेतकऱ्याला किमान दहा आर. क्षेत्रावर सलग लागवड करावी लागेल. तालुकास्तरावर सर्वसाधारण गटासाठी १० पेक्षा कमी व आदिवासी गटात पाचपेक्षा कमी अर्ज आल्यास स्पर्धा रद्द केली जाणार आहे.
राज्य शासनाकडून उत्पादकता वाढविण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही याचा लाभ होत असतो. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मिळत असते. शेतकऱ्यांना आपली उत्पादकता वाढविणे लाभदायक ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करीत आहे.
- उज्ज्वला बाणखेले,
जिल्हा कृषी अधिकारी, रायगड
तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर स्पर्धा
तृणधान्य आणि कडधान्य पिकांची स्पर्धा ही तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर घेतली जाणार आहे.
५० हजारांपर्यंत बक्षीस
गावपातळीवर पहिले बक्षीस पाच हजारांचे असेल तर राज्यपातळीवर पहिले बक्षीस ५० हजारांचे असणार आहे.