- निखिल म्हात्रे अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रायगड जिल्ह्यात सातत्याने वाढत आहे. या रुग्णांच्या उपचाराचा ताण येथील आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. अलिबाग शहरातील जिजामाता रुग्णालयात ७० आणि जिल्हा सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात २० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील क्षमता संपत चालली आहे. आधीच पनवेल आणि मुंबईतील रुग्णालयांवर ताण पडत असल्याने अलिबाग येथील आरसीएफ आणि उरणमधील जेएनपीटीचे रुग्णालय आरोग्य विभागाने मागितले होते, परंतु त्यांनी नकार दिल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाभरातील कोरोनाबाधित रुग्णांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खाटांची कमतरता भासणार आहे. सध्या रुग्णालयात ९० खाटांची सोय असून ती अपुरी पडणार आहे. याचा ताण जिल्हा आरोग्य यंत्रणेवर पडत आहे.
कोरोनाबाधित असलेले सुमारे ७० रुग्ण अलिबाग शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी ६० रुग्ण हे जिजामाता रुग्णालयात तर २० रुग्ण जिल्हा सामान्य रुगालयात उपचार घेत आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या १५ तालुक्यांच्या विविध भागांतून उपचासाठी रुग्ण दाखल करण्यासाठी येत आहेत. अलिबाग, उरण, माणगाव, पेण, मुरुड, श्रीवर्धन या ठिकाणांहून ९० रुग्ण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, अलिबागमध्ये रुग्णसंख्या वाढत जाणार असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अद्ययावत रुग्णालयासाठी प्रशासनाचे प्रयत्न
1. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने येणाºया नव्या रुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालय मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
2. अलिबाग येथील आरसीएफ आणि उरणमधील जेएनपीटीचे रुग्णालय आरोग्य विभागाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी मागितले होते; परंतु त्यांनी देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’ला दिली.
3. आरसीएफ आणि जेएनपीटी रुग्णालयात नियमित रुग्ण आहेत. त्यामुळे येणाºया नवीन रुग्णांना उपचारासाठी कुठे दाखल करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याकडे डॉ. गवई यांनी लक्ष वेधले.