उरण : जीटीआय अधिकारी व कामगार आणि सर्वपक्षीय संघर्ष समिती यांच्यामध्ये जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी मंगळवारी बैठक बोलावून यशस्वीपणे सकारात्मक चर्चा घडवून आणली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर समाधानकारक तोडगा निघाल्याने मागील १९ दिवसांपासून जीटीआय कामगारांनी सुरू केलेले बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जीटीआय आणि कामगारांमधील तिढा सुटल्याने १९ दिवसांपासून ठप्प झालेले बंदराचे काम बुधवारपासून (१२) सुरळीत सुरू झाले असल्याची माहिती बंदराचे आॅपरेशन मॅनेजर राजेश सिंग यांनी दिली.जीटीआय अधिकारी आणि संघर्ष समिती यांच्यात शुक्रवारी (७) चार तासांच्या झालेल्या बैठकीतही कामगारांच्या मागण्यांबाबत जीटीआयकडून कामगारांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नसल्याने चौथी बैठकही निर्णयाविना निष्फळच ठरली होती. आंदोलनामुळे जीटीआय बंदराचे काम पूर्णत: ठप्प झाल्याने त्याचा विपरित परिणाम जेएनपीटी, डिपी वर्ल्ड बंदरांबरोबरच, सीएफएस, सीडब्ल्यूसी, सीडब्ल्यूसी, शिपिंग कंपन्यांवर लागल्याने दररोज कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होऊ लागले होते. जीटीआय बंदराचेच १९ दिवसांत सुमारे ८० कोटींचे नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी पुन्हा पुढाकार घेऊन मंगळवारी (११) बैठक बोलाविण्यात आली होती. जेएनपीटीच्या प्रशासन भवनात पोलीस बंदोबस्तात आयोजित केलेल्या या बैठकीस माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, मनसेचे अतुल भगत, संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, उरण संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.
जीटीआय कामगारांचा तिढा सुटला; बंदराचे काम सुरू
By admin | Published: August 13, 2015 11:26 PM