रोजगार मेळाव्यात ७०२ जणांना हमीपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:58 AM2019-06-09T01:58:43+5:302019-06-09T01:59:59+5:30
९२३ जणांना मुलाखतीसाठी निमंत्रण । पनवेलमध्ये हजारो उमेदवारांनी केली नोंदणी
पनवेल : खांदा वसाहत येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात शनिवारी ७०२ जणांना जागेवरच रोजगार हमीपत्रक देण्यात आले, तर ९२३ जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेले आहे. मल्हार रोजगार व सीकेटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात आयोजित ‘भव्य रोजगार मेळावा २०१९’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात विविध क्षेत्रातील ६८ अग्रगण्य कंपन्या सहभागी झाल्या होत्या. एकूण ३६८० उमेदवारांची दुपारपर्यंत नोंदणी केली होती. यामधील ७० टक्के उमेदवार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील, तर उर्वरित उरण, पेण, कर्जत व नवी मुंबई परिसरामधून या ठिकाणी सहभागी झाले होते.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा आदी क्षेत्रात आदर्श काम करण्याबरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर उल्लेखनीय कार्य करत असल्याचे विचार या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला १५ वा रोजगार मेळावा असून आजपर्यंत ७६८० जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
मेळाव्यात शिक्षित-अशिक्षित, दहावी-बारावी उत्तीर्ण-अनुउत्तीर्ण, पदवीधर, अभियंता व इतर अशा शैक्षणिक पात्रतेनुसार हजारो नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आल्या.