अलिबाग : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र यावरील मतदानासंदर्भात जनजागृती अभियान सुरू आहे. या अभियानात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थिर मतदान व व्हीव्हीपॅट यंत्र जनजागृती पथकाने स्थापन केलेल्या चाचणी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच उपस्थित सर्व आमदार व लोकप्रतिनिधींनी चाचणी मतदान करून पाहिले.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आपण दिलेले मतदान नेमके कुणाला गेले याबाबत शंकेला वाव असू नये यासाठी व्हीव्हीपॅट यंत्र संलग्न करण्यात आले आहे. आपण मतदान यंत्रावर ज्या चिन्हाचे बटन दाबले त्याच चिन्हाचे अंकन केलेली कागदी स्लिप येते ती सात सेकंद मतदारासमोर राहते व नंतर यंत्रात जमा होते. याद्वारे आपण जे बटन दाबले त्याच चिन्हाला मतदान झाले याची खात्री मतदाराला होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य आमदार व लोकप्रतिनिधींनी स्वत: चाचणी यंत्रावर मतदान केले व व्हीव्हीपॅट यंत्रावर त्याच चिन्हाची चिठ्ठी येत असल्याची खात्री केली.या चाचणीत जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, आ. बाळाराम पाटील, आ. भरत गोगावले, आ. मनोहर भोईर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अॅड.आस्वाद पाटील आदींनी स्वत: चाचणी मतदान केले व खात्री करून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.