गायमुखला पर्यटनाचा दर्जा देणार, पालकमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:56 AM2020-02-19T01:56:49+5:302020-02-19T01:56:57+5:30
पालकमंत्र्यांचे आश्वासन : तळा येथे जनता दरबार
तळा : पंचायत समितीच्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृह जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पुढे नागरिकांनी बेरोजगारी, पाणी प्रश्न, रस्त्याची झालेली दुरवस्था अशा विविध समस्यांचा पाढा वाचला. तालुक्यातील गायमुखला पर्यटनाचा दर्जा दिला जाईल तसेच ऐतिहासिक कुडालेणी, तळगड यांचादेखील विकास केला जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
सुरुवातीलाच नागरिकांनी महावितरण विभागाच्या मनमानी कारभाराची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली. सूचना न देता वीजपुरवठा बंद करणे, मीटरची रीडिंग न घेता वीजबिल देणे, बिल्डरांना दहा दिवसांत मीटर दिला जातो तर गोरगरीब जनतेला महिना उलटूनही मीटर दिले जात नाहीत, तक्रारीसाठी कार्यालयात गेले असता अधिकारी उपस्थित नसतात अशा अनेक तक्रारींचा पाढाच वाचला. तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न, बसस्थानकाची झालेली दुरवस्था, पर्यटनवाढीची उपाययोजना, खेडेगावातील रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या शेतकरी बांधवांनी मांडल्या. त्याला उत्तर देताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तालुक्यात कंपन्या येऊन रोजगार उपलब्ध केला जाणार आहे, बसस्थानकाची दुरुस्ती करून योग्य सुविधा पुरविल्या जातील, पाण्याची टंचाई असलेल्या गावात पाण्याचे नवीन पाइप टाकण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून लवकरच कामे सुरू केली जातील. अपूर्ण असलेल्या रस्त्यांचे काम लवकरच पूर्ण करण्यात येतील.
या जनता दरबारात तहसीलदार ए.एम. कनशेट्टी, गटविकास अधिकारी विजय यादव, पंचायत समिती सभापती देवकी लासे, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांसह सर्व शासकीय अधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.