अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात आराेग्य उपकरणांचे पालकमंत्र्यांनी केले लाेकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 08:36 AM2021-01-17T08:36:19+5:302021-01-17T08:38:48+5:30
जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यातून माेठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, त्यांना आवश्यक असलेल्या आराेग्य सुविधा पुरेशा मिळत नसल्याची बाब नागाव येथील आठवले परिवाराच्या लक्षात आली हाेती.
आविष्कार देसाई
रायगड :अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात नव्याने बसविण्यात आलेल्या डिजिटल एक्सरे, सी.आर. सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर, मॅमोग्राफी मशीनचे लोकार्पण शनिवारी झाले. अलिबाग-नागाव येथील आठवले परिवाराने महादेव गणेश आठवले आणि रजनी महादेव आठवले यांच्या स्मरणार्थ लाखाे रुपयांची आराेग्य साधने दान केली आहेत. मात्र, आजच्या लाेकापर्ण साेहळ्यामध्ये आठवले परिवारातील एकही सदस्य उपस्थित नव्हते.
जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यातून माेठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, त्यांना आवश्यक असलेल्या आराेग्य सुविधा पुरेशा मिळत नसल्याची बाब नागाव येथील आठवले परिवाराच्या लक्षात आली हाेती. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना उपयाेग व्हावा यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाला आवश्यक त्या सुविधा देण्यावर आठवले परिवारातील सदस्यांचे एकमत झाले. त्यानुसार त्यांनी डिजिटल एक्सरे, सी.आर. सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर, मॅमोग्राफी मशीन देण्याचे ठरवले. मात्र, त्यांच्या किमती प्रचंड असल्याने आठवले परिवाराने उपकरणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी थेट संपर्क साधला.
समाजासाठी आम्ही या मशीन दान करणार असल्याने आपणही किमती कमी कराव्यात, अशी विनंती कंपन्यांना केली हाेती. कंपन्यांनीही ती मान्य केली आणि जिल्ह्यासाठी एक वर्षापूर्वीच संबंधित उपकरणे आली. त्यानंतर काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे त्याचे रीतसर लाेकार्पण करता आले नाही. आठवले परिवाराला काेणत्याच राजकीय पक्षातील व्यक्तींकडून लाेकार्पण करायचे नव्हते.
यासाठी त्यांनी आराेग्य आणि जिल्हा प्रशासनाला अवगत केले हाेते, अशीही चर्चा कार्यक्रमस्थळी हाेत हाेती. शनिवारी सकाळी डिजिटल एक्सरे, सी.आर. सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर, मॅमोग्राफी मशीनचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, शेकापचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह अन्य राजकीय व्यक्ती उपस्थित हाेत्या. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी निधी चाैधरी, जिल्हा पाेलीस अधीक्षक अशाेक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, आरसीएफचे अधिकारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित हाेते. आठवले परिवानराने येथील आरसीएफ कंपनी, मुंबईतील नाना पालकर समितीलाही भरीव आर्थिक मदत दिली आहे.
समाजाला उपयोग व्हावा, यासाठी केली मदत, आमचा सहभाग संपला- आठवले -
- दरम्यान, आम्ही समाजाला उपयाेग व्हावा यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाला आवश्यक असणारी उपकरणे दिली आहेत. आता आमचा सहभाग संपला आहे. आमचा कोणत्याही राजकीय पक्ष वा व्यक्तीसोबत आकस नाही. त्यामुळे अन्य काेणत्याही वादात आम्हाला जायचे नाही, अशी नाराजी आठवले परिवाराने व्यक्त केली.
- आठवले परिवाराने लाेकार्पण साेहळ्याची निमंत्रण पत्रिकाही छापली हाेती. त्यामध्ये जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. तसेच निमंत्रक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुहास माने यांचे नाव आहे, तर साैजन्य म्हणून आठवले परिवार आणि आरसीएफ लि. थळ असे लिहिले आहे.