लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: मुंबईकडून अलिबागला स्पीड बोटने येताना सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे हे मोठ्या अपघातातून बचावले. चालकांचे स्पीड बोटीवरचे नियंत्रण सुटले आणि बोट मांडवा जेट्टीजवळ धक्क्याला न थांबता सुमारे ५० फूट पुढे भरकटत जाऊन किनाऱ्यावर आदळली. सुदैवाने दोघांना कसलीही दुखापत झाली नाही. मात्र, स्पीड बोटचालकांचा बेफिकरीपणा चव्हाट्यावर आला आहे.
पालकमंत्री सावंत यांची स्पीड बोटमध्ये अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची बोट समुद्रात बंद पडली होती. शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात नियोजन बैठकीसाठी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे, पालकमंत्री सामंत यांनी जिल्हा प्रशासन व पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची अलिबाग येथील मुख्यालयात बैठक बोलाविली होती. त्यासाठी दोघे मुंबईतून एका खासगी कंपनीच्या स्पीड बोटीने अलिबागसाठी रवाना झाले होते. दरम्यान, या प्रकाराने मंत्री सामंत, संभाजीराजे यांच्यासह अन्य अधिकारी क्षणभर भांबावून गेले.