पनवेल : मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयाची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, आमदार, महापौरांच्या उपस्थितीत पाहणी केली. या वेळी २५ जूनपर्यंत या रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याची सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या.
रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी पनवेल येथे शासकीय रुग्णालय उभारण्यात आले आहे. १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि २० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर पनवेलमध्ये आकार घेत आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठीही त्यांनी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. सध्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम अनेक महिने रखडले आहे. ते काम पूर्ण होऊन रुग्णालयाचे लोकार्पण व्हावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने रुग्णालयाच्या कामाची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रुग्णालयाच्या कामाला भेट दिली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णालयाचे काम रखडले असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.या वेळी पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंता सतीश श्रावदे यांना उप जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे दरवाजे, शौचालयाची कामे, सफाई आणि लादी पॉलिश व संबंधित कामे १५ दिवसात पूर्ण करून आरोग्य खात्याला इमारतीचा ताबा देण्याचे आदेश दिले. आरोग्य उपसंचालिका गौरी राठोड यांनी आमची यंत्रसामग्री आलेली असून ती बसविणे आणि १०७ पदे मंजूर आहेत, त्यातील ५४ पदे प्रतिनियुक्तीने भरून रुग्णालय सुरू करता येईल त्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागेल अशी माहिती दिली. १७ जूनपासून सुरू होणाºया विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बैठक घेऊन उरलेल्या कामांना मंजुरी घेण्याचे यावेळी ठरले असून लवकरच हे उपजिल्हा रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या या पाहणी दौºयावेळी सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समितीचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, आरोग्य खात्याच्या उपसंचालिका गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, पनवेलचे वैद्यकीय अधीक्षक नागनाथ एमपल्ले, बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सतीश श्रावदे आदी उपस्थित होते.