कर्जत इंग्लिश मीडियम शाळेला पालकांनी ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:49 AM2019-04-26T00:49:13+5:302019-04-26T00:49:26+5:30
२ मेपासून उपोषण : दहावीच्या मुलांचे चित्रकला, गायन विषयांचे अतिरिक्त गुण बोर्डात न कळवल्याने रोष
कर्जत : शहरातील प्रथितयश समजल्या जाणाऱ्या कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरिक्त गुण मुंबई बोर्डाला वेळेवर कळविले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी गुरु वारी शाळेला टाळे ठोकले. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन पालक संघर्ष समिती २ मेपासून शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात उपोषण सुरू करणार आहेत. याबाबत मुख्याध्यापक व संस्था चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.
कर्जत शहरातील इंग्लिश मीडियम स्कूलने २०१९ मध्ये दहावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या अतिरिक्त विषयांचे वाढीव गुण मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. ५४ विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि दोन विद्यार्थ्यांचे गायन या विषयातील अतिरिक्त वाढीव गुण मुंबई बोर्डाला वेळेत कळविले गेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता पालक संतप्त झाले. पालकांनी संघर्ष समिती स्थापन करून जोरदार उठाव केला असून पालकांनी आपल्या पाल्यांसह २५ एप्रिल रोजी शाळेत येऊन शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांना धारेवर धरले. पालकांनी आमच्या मुलांचे दोन टक्के गुणांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी टाळे आणून कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलला टाळे ठोकले. मुख्याध्यापक विनोद अळसुंदेकर आणि संस्थेचे सचिव श्रीकांत मनोरे यांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण गुण मिळणार याची खात्री शाळा व्यवस्थापन देत नसल्याने पालक संतप्त झाले. कार्यकारिणी सदस्यांना बोलवून आणा असा आक्र मक पवित्रा पालकांनी घेतला. त्यामुळे कर्जत एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य विजय जोशी, शमा काळे, देवीचंद ओसवाल हे तेथे पोहचले.
शेवटी पालक वर्गाने स्थापन केलेल्या पालक संघर्ष समितीने आक्र मक होत दोन वेगवेगळे पर्याय अवलंबून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी २ मेपासून पालक कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात उपोषण करणार आहेत. संस्था व्यवस्थापन समिती जबाबदारी टाळत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली गेली. मुलांना गुण मिळावेत त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपण उपोषण केल्यास मी सुद्धा उपोषणास बसेन असे सचिव मनोरे यांनी स्पष्ट के ले.
पालकांनी बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. पालकांनी शाळेला टाळे लावल्यानंतर शेवटी संस्थेचे अध्यक्ष झुनकरनैन डाभिया आले आणि त्यांनी पालकांच्या भावना समजून घेत निवडणुका असल्याने संबंधित मंत्री व अधिकारी वर्गाची भेट होत नाही.
निवडणूक झाल्यानंतर आम्ही मंत्रालयात जाऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन दिले, तरीही पालकांचे समाधान झाले नाही. ते उपोषणावर ठाम होते. त्यानंतर सर्व पालक कर्जत पोलीस ठाण्यात पोहचले आणि पोलिसांना निवेदन दिले.