कर्जत : ‘आपल्या पाल्यांना पठडीबाज शिक्षण दिले तर ते एकांगी होईल, या जगात त्याचा निभाव लागणे कठीण होऊन बसेल. मुलांकडे बघायला पालकांना वेळ मिळत नाही, त्यातच एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. मुलांच्या कलाने घ्या, त्यांचे हट्ट पुरवा, त्यांच्यासाठी वेळ द्या. त्यांना वाचनाची सवय लावा. वाचनातच व्यक्तिमत्त्वाची श्रीमंती दडली आहे. हल्ली पालकत्व निभावणे हे जगातील सर्वात अवघड काम होऊन बसले आहे. त्यामुळे पालकांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली पाहिजे,’ असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक व ज्येष्ठ बालकवी अनंत भावे यांनी येथे दिला. अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शिशुमंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत भावे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून स्नेहसंमेलनाचे आणि संत विचारावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.आज अनेक क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलांना केवळ नोकरी कर, असे म्हणणे चुकीचे असून त्यांच्या कलागुणांना वाव तसेच प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजे, असेही भावे यांनी सूचित केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश वैद्य, शालेय समिती अध्यक्षा अनुपमा कुलकर्णी, सदस्या सविता मुजुमदार, अरविंद पड्याळ, मुख्याध्यापिका उमा डोंगरे आदी उपस्थित होते. स्नेहसंमेलन प्रमुख भारती जोशी व पल्लवी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे झाडाचे रोप व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. उमा डोंगरे यांनी प्रास्ताविकात ‘सत्तावीस वर्षांपूर्वी शाळा सुरू करताना केवळ शंभर विद्यार्थी होते, परंतु आज शाळेत पंधराशे विद्यार्थी आहेत यावरूनच शाळेची गुणवत्ता दिसून येते’, असे स्पष्ट केले. अनंत भावे यांनी अब्राहम लिंकन, सचिन तेंडुलकर, अकबर-बिरबल आदी गोष्टींतून त्यांच्या पालकत्वाचा अनुभव सांगितला. त्यानंतर अनेक बालकविता सादर केल्या. गणेश वैद्य यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता जोशी व मंजूषा सोनावणे यांनी केले.
पालकत्व निभावणे हे सर्वात अवघड काम
By admin | Published: January 01, 2017 3:33 AM