चालकांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन
By admin | Published: January 11, 2017 06:20 AM2017-01-11T06:20:11+5:302017-01-11T06:20:11+5:30
वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामार्गावर वाहन चालकांनी कोणती खबरदारी घ्यावी, वाहन चालवताना कशी दक्षता घ्यावी
दासगाव : वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामार्गावर वाहन चालकांनी कोणती खबरदारी घ्यावी, वाहन चालवताना कशी दक्षता घ्यावी? याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण राज्यभर रस्ता सुरक्षा अभियान सोमवार, ९ जानेवारीपासून सुरू झाले. केंबुर्ली हद्दीत असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये महाडच्या पोलीस उपअधिकारी प्रांजली सोनावणे यांच्या हस्ते १५ दिवसांच्या २८व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन के ले.
रस्ता सुरक्षा अभियान ९ ते २३ जानेवारी अशा १५ दिवसांत सुरू राहणार आहे. मद्यपान करून वाहन चालविणे, वाहन चालविताना सीटबेलटचा वापर करणे, तसेच ज्या वाहनचालकांना दृष्टी कमी आहे त्यांची तपासणी करणे, अशा अनेक कारणांमुळे वाहनचालकांच्या हलगर्जीमुळे वारंवार अपघात होत असतात. याबाबत वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान मोहीम राबविली जात आहे.
सोमवारी २८व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा महाड महामार्ग वाहतूक शाखेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महाड शहराचे पो. नि. रवींद्र शिंदे, महाड तालुक्याचे पो. नि. पाटील तसेच महाड औद्योगिक वसाहतीचे पो. नि. नंदकुमार सस्ते तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक वाहनचालकांनी येथे थांबून कार्यक्रमाला हजेरी लावली. (वार्ताहर)