अलिबाग : गुजरात येथून रायगड हद्दीत मच्छीमारीसाठी आलेल्या एका मच्छीमार बोटीला अपघात झाल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी घडली होती. या अपघातग्रस्त बोटितील सर्व प्रवासी सुखरूप असून आज २० ऑगस्ट रोजी बुडालेली बोट दिवेआगर समुद्रात अडकली आहे. हवामान खराब असल्याने बोट काढण्यास अडचण येत असून प्रयत्न सुरू असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
गुजरात येथील तीन बोटी समुद्रात मच्छीमारीसाठी रायगड हद्दीत आल्या होत्या. यामध्ये बना सागर ही बोटही मच्छीमारीसाठी काही खलाशांसह रायगड हद्दीत दिघी आडगाव याच्यामध्ये ९ किलोमिटर अंतरावर मच्छीमारी करीत होते. त्यावेळी बोटीची खालील फळी तुटल्याने बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने ती बुडू लागली. यावेळी बना सागर बोटी सोबत असलेल्या इतर दोन बोटीवरील लोकांनी मदत कार्य सुरू असल्याची माहिती कोस्ट गार्ड विभागाला मिळाली. त्यानुसार त्वरित रायगड कोस्ट गार्ड घटनास्थळी दाखल झाले. कोस्ट गार्ड येई पर्यंत बोटीच्या सोबत असणाऱ्या गुजरातच्य इतर २ बोटिनी त्यातील एकूण सर्व ७ खलाशांना सुखरूप वाचवले व दुसऱ्या बोटीवर घेतले.
तसेच पाणी भरलेली बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी पूर्ण भरल्याने ती बाहेर निघाली नाही. तिचे टोक पाण्यावरच तरंगत होते. नंतर अंधार पडल्यावर बोट काढण्याचे काम थांबवण्यात आले. कोस्ट गार्डचे असिस्टंट कमांडंट यांनी बोटीच्या मालकाशी संपर्क करून सर्व प्रवासी सुखरूप असल्याबाबतची खात्री केली. आज रविवारी २० ऑगस्ट रोजी बुडालेली बोट ही दिवेआगर समुद्रात अडकली असून खराब हवामानामुळे काढण्यात अडचण येत आहे. असे पोलिसांनी म्हटले आहे.