आखातातील युद्धाचा कंटेनर मालवाहतुकीवर परिणाम, टक्केवारी घसरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 02:32 AM2020-01-21T02:32:28+5:302020-01-21T02:33:24+5:30

आखातातील इराण-अमेरिका यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जेएनपीटीवरच नव्हेतर, आंतरराष्ट्रीय बंदरावरही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

Gulf War Impact on Shipping Container | आखातातील युद्धाचा कंटेनर मालवाहतुकीवर परिणाम, टक्केवारी घसरणार

आखातातील युद्धाचा कंटेनर मालवाहतुकीवर परिणाम, टक्केवारी घसरणार

Next

उरण : आखातातील इराण-अमेरिका यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जेएनपीटीवरच नव्हेतर, आंतरराष्ट्रीय बंदरावरही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंटेनर मालाच्या वाहतुकीची टक्केवारी घसरणार असून यंदा बंदरातील मालाच्या जलवाहतूक आयात-निर्यात व्यापारात फक्त तीन-चार टक्के इतकीच वाढ होईल, असा अंदाज जेएनपीटी अधिकाऱ्यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

जेएनपीटी बंदराच्या वार्षिक व्यवसाय, विकसित प्रकल्प विविध कार्यान्वित करण्यात आलेल्या योजना आणि भविष्यात विकासाच्या योजनांची माहिती देण्यासाठी जेएनपीटी प्रशासन भवनाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी डेप्युटी कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर, बंदर प्रशासनाचे सचिव तथा मुख्य प्रबंधक जयंत ढवळे, प्रबंधक एन. के. कुलकर्णी, एस. व्ही. मदभावी, मार्केटिंग असिस्टंट मॅनेजर अंबिका सिंग, वित्त विभागाचे व्यवस्थापक संजीव कुमार, एस. एम. शेट्ठी आदी उपस्थित होते.
आखातातील इराण-अमेरिका युद्धामुळे आयात-निर्यात व्यापारात जेएनपीटी बंदरावरच नव्हेतर, जागतिक बंदरावर या वर्षी मोठा परिणाम दिसून येणार आहे. आखातातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय कंटेनर मालाच्या वाहतुकीच्या आयात-निर्यातीच्या व्यापारात या वर्षात तीन-चार टक्के इतकीच वाढ होण्याची शक्यता यंदा वर्तविण्यात येत आहे.

डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी) धोरणात ८० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. उरण परिसरातील सुरू असलेल्या तीन हजार कोटी खर्चाचे सात उड्डाणपूल, कॉरिडॉर आणि सहा-आठ पदरी रस्त्यांचे बांधकाम मुदतीत झाले नाही. २७७ हेक्टर क्षेत्रावर सुरू असलेले जेएनपीटी सेझचे कामही संथपणे सुरू आहे. या कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही मुदतीत काम होण्याची शक्यता कमीच आहे.

तसेच जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीचे जेएनपीटी बंदर दिवसेंदिवस तोट्यात चालले आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू आहेत. लांबलेला पावसाळा आणि उड्डाणपुलाच्या स्पॅन चेसिजमधील कामातील झालेले काही तांत्रिक बदल आदी कारणांमुळे कामांना विलंब होत असल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी  सांगितले.

एनएचआय (नॅशनल हायवे अ‍ॅथारिटी) यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या तीन हजार कोटींच्या उड्डाणपूल, कॉरिडॉर आणि सहा-आठ पदरी रस्त्यांची लांबलेली कामे येत्या एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान पूर्ण होतील, असा विश्वास जेएनपीटी अधिकाºयांनी व्यक्त
केला.

ठाणे जिल्ह्यातील पालघर -डहाणू येथील दहा हजार कोटींच्या वाढवण बंदराचे कामही नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच व्यापार, व्यवसायाच्या वृद्धीसाठी विकासाच्या अनेक योजना अंमलात आणल्या जाणार असल्याची माहितीही जेएनपीटी अधिका-यांनी दिली.

वर्धा आणि जालना ड्राय पोर्टसाठी बेसिक पायाभूत सुविधा जेएनपीटीकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
छोटे-मोठे व्यापारी आणि शेतकºयांना शेतीमाल कमी खर्चात थेट जेएनपीटी बंदरातून निर्यात करणे, शक्य होणार आहे.
तसेच जेएनपीटी बंदराच्या समुद्र चॅनेलची खोली वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बंदरात १५.६ मीटर खोलीपर्यंत मालवाहू जहाजे येऊ लागली आहेत.
 

Web Title: Gulf War Impact on Shipping Container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.