कोंडी धनगरवाड्यातील रस्त्यासाठी गुरुजी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:10 PM2020-12-16T23:10:05+5:302020-12-16T23:10:13+5:30
ग्रामस्थांसह राबविली श्रमदान मोहीम
- विनोद भोईर
पाली : सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाड्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेली कोंडजाई देवीचे मंदिर ही या ठिकाणीच आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मागील कित्येक वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजी झालेली नाही. अखेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक राजेंद्र खैरे तसेच स्वदेस फाउंडेशनचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर दीपक मेनन यांनी ग्रामस्थांना एकजूट करून श्रमदानातून हा रस्ता सुकर केला आहे. ही मोहीम तीन दिवसांत पूर्ण झाली.
शिक्षक राजेंद्र खैरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व ग्रामस्थ हाती फावडे, कुदळ, घमेले आदी साहित्य घेऊन रस्ता दुरुस्तीसाठी एकत्र आले. मोहिमेत महिला, लहानगे, वृद्ध आदींचा पुढाकार होता. रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली खडी व दगड व्यवस्थित पसरण्यात आले. मोठाले दगड हटविण्यात आले. आजूबाजूची झाडेझुडपे तोडण्यात आली. त्यानंतर पसरलेल्या दगडांवर बुरम व मातीचा भराव त्यावर टाकण्यात आला आणि रस्ता सुस्थितीत करण्यात आला.
सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडा म्हणजे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या आणि हातावर पोट असलेल्या गरिबांचे गाव. गावापर्यंत एसटीची सुविधा नाही. येथून जवळपास चार-साडेचार किमी अंतरावर नागशेत गावाला एसटी येते. मात्र नागशेत ते कोंडी धनगरवाड्यापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून नवीन रस्ता सोडाच, पण जुन्या रस्त्याची साधी डागडुजीही झालेली नाही. त्यामुळे येथे मोठाले खड्डे पडले आहेत. दगड व माती वर आल्याने येथून चालणेही दिव्य आहे. येथील वृद्ध, महिला, रुग्ण व विद्यार्थ्यांना या खडतर रस्त्यावरून ८ किलोमीटरची पायपीट करावी लागते. विशेष म्हणजे हा रस्ता पूर्णपणे जंगलातून जातो. राजकीय पुढारी, नेते तसेच शासन फक्त आश्वासनांशिवाय काही देत नसल्याचे ग्रामस्थ विशाल ढेबे यांनी सांगितले. तर मंगेश ढेबे यांनी शिक्षक राजेंद्र खैरे व स्वदेसचे दीपक मेमन यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांना श्रमदानासाठी एकत्र केले. या श्रमदान मोहिमेत शिक्षक राजेंद्र खैरे, ग्रामपंचायत सदस्य बाळू ढेबे, स्वदेस फाउंडेशनचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर दीपक मेनन, ग्रामस्थ प्रकाश ढेबे, रामचंद्र बावधाने, दगडू कोकरे, मंगेश ढेबे, सुनील हिलम, भाऊ बावधाने, दगडू गोरे, व लक्ष्मण ढेबे, नामदेव ढेबे व पांडुरंग ढेबे आदी सहभागी झाले होते.
श्रमदानाचे महत्त्व खूप मोठे आहे. कोंडी धनगरवाडीला सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे पुढारी व नेत्यांची अधिक वाट न पाहता गावकऱ्यांना सोबत घेऊन येथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामस्थांचे यासाठी खूप मोठे योगदान आहे.
- राजेंद्र खैरे, शिक्षक, राजीप कोंडी, धनगरवाडा
शिक्षक राजेंद्र खैरे यांनी पुढाकार घेऊन लोकांमध्ये श्रमदान व गावातील समस्या सोडविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ते खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक आहेत.
- बाळू ढेबे, ग्रामपंचायत सदस्य