तलासरी पोलिसांनी पकडला गुटख्याचा टेम्पो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:42 PM2021-01-10T23:42:42+5:302021-01-10T23:42:49+5:30
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाने गुजरातमधून राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला याची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. गुटख्याची वाहतूक करणारे अनेक वेळा वेगवेगळ्या शक्कल लढवून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करीत असतात
लाेकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : तलासरी पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील आरटीओ सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचून गुटखा वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला. या वेळी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाने गुजरातमधून राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला याची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. गुटख्याची वाहतूक करणारे अनेक वेळा वेगवेगळ्या शक्कल लढवून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करीत असतात. महाराष्ट्रात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता असून तलासरी पोलिसांनी रात्री केलेल्या कारवाईत विमल गुटखा, व्ही १ तंबाखू व टेम्पो असा एकूण २५ लाख ३७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शमशाद अहमद अब्दुल हनाम (२७) यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस करीत आहेत. आठ दिवसांपूर्वीही तपासणी नाक्यावर अवैध गुटख्याचे दोन टेम्पो पकडून ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तलासरीला लागून असलेल्या केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली येथे गुटखा बनविण्याचे मोठ्या प्रमाणात कारखाने असून येथून दररोज शेकडो ट्रक विविध क्लृप्त्या लढवून अवैधपणे महाराष्ट्रात गुटखा आणत असतात. यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.