कळंबोली : गेल्या दोन-चार वर्षांपासून सार्वजनिक गणेश मंडळांकडून इकोफ्रेंडली बाप्पा, पर्यावरणपूरक सजावटीवर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे समाजप्रबोधनात्मक संदेश देण्यावरही भर दिला जात आहे. बेटी बचाओ... बेटी पढाओ..., झाडे वाचवा... झाडे जगवा..., प्लॅस्टिकबंदी बरोबरच अनेक मंडळांनी यंदा दानपेटी ऐवजी ज्ञानपेटीची थीम ठेवली आहे.पोदी येथील एका मंडळाने बाप्पासमोर दानपेटी ऐवजी ज्ञानपेटी ठेवली आहे. यात भक्तांकडून वह्या, पुस्तके, पेन तसेच इतर शालेय साहित्य दान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खांदा वसाहतीतील एका मंडळानेही शिक्षणपेटी ठेवली आहे. या पेटीवर कृपया पैसे टाकू नये, असे लिहिले असून भक्तांकडून शैक्षणिक साहित्य स्वीकारले जात आहे. सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ ठेवणाऱ्या मंडळांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.पनवेल परिसरात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक विषयांवर देखावा उभारून जनजागृती केली आहे. काहींनी ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकत शासन, लोकप्रतिनिधी समाजाचे लक्ष वेधले आहे. पोदीतील मंडळाच्या ज्ञानपेटीत अनेक गणेशभक्तांनी वह्या, पुस्तक, पेन व इतर शालेय साहित्य दान म्हणून दिले आहे. त्याचबरोबर नवीन टीशर्टही देण्यात आले आहेत. हे साहित्य २१ सप्टेंबर रोजी आदिवासी विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
गणपती बाप्पापुढे दानपेटीऐवजी ठेवली ज्ञानपेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 3:53 AM