अलिबाग : जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांचे कट्टर समर्थक नैनुद्दीन हळदे यांनी पक्षाचा आणि रायगड जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हळदे यांनी समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यातील जनसुराज्य पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवसेनेने हळदे यांची महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. मुंबई-कुर्ला येथील उध्वगड येथील महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या कार्यालयात हळदे यांचा पक्षप्रवेश पार पडला. शिवसेनेचे उपनेते तथा महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे राज्याचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी त्यांना भगवी शाल दिली. त्याचबरोबर त्यांची महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती केली. त्याबाबतचे पत्रही त्यांना देण्यात आले. हळदे यांनी २००८ साली जनसुराज्य पक्षाची पहिली मुहूर्तमेढ रायगड जिल्ह्यात रोवली होती. त्यानंतर २००९ आणि २०१४ची विधानसभा निवडणूक लढवली होती. पक्षाला निवडणुकीत यश मिळवता आले नसले, तरी त्यांनी जनसुराज्य पक्षाची ओळख रायगड जिल्ह्यातील घराघरांत पोहोचवली होती. त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने जनसुराज्य पक्षाचे रायगड जिल्ह्यातील अस्तित्व धोक्यात आले असल्याचे बोलले जाते. पक्ष संघटन वाढविण्यावर भर देणार असल्याचे हळदे यांनी सांगितले. याप्रसंगी सिराज शेख, अब्दुल बारी यांच्यासह दिलीप, तोहीत कुरेशी अन्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हळदे यांची जनसुराज्य पक्षाला सोडचिठ्ठी
By admin | Published: February 13, 2017 5:12 AM