रोह्यात निम्मे लाभार्थी बोगस
By admin | Published: July 22, 2015 03:27 AM2015-07-22T03:27:41+5:302015-07-22T03:27:41+5:30
रोहा तहसील कार्यालयामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे सोशल आॅडिट चालू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा विचार करता रोहा
रोहा : रोहा तहसील कार्यालयामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे सोशल आॅडिट चालू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा विचार करता रोहा तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे सर्वाधिक लाभार्थी आहेत. यातील ५० टक्क्याहून अधिक लाभार्थी बोगस असल्याची माहिती सर्वेक्षणात समोर आली आहे.
तहसील कार्यालयामार्फत मागील चार महिने सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर लाभार्थ्यांची कागदपत्रे घेऊन तपासणीसाठी प्रत्येक मंडळनिहाय शिबिर घेण्यात आले. सर्वाधिक बोगस लाभार्थी श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना यामध्ये असल्याचे दिसून येत आहे. वृध्द आई-वडिलांना सांभाळणे ही मुलांची जबाबदारी आहे. मात्र रोहा तालुक्यात आई-वडिलांचे विभक्त रेशनकार्ड बनवून श्रावणबाळ वृध्दापकाळ पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा गोरखधंदा मागील १० वर्षांपासून चालू होता.
अनेक वृध्द व्यक्तींची मुले चांगल्या पगारावर कायमस्वरुपी नोकरीवर असताना देखील या वृध्दांना पेन्शन योजनेचे गाजर दाखवण्यात येत आहेत.
सत्तेच्या दबावामुळे स्थानिक तलाठी व इतर अधिकारी देखील २१ हजारांच्या आत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला देत असल्याने पुढाऱ्यांचे फावले होते. (वार्ताहर)