अलिबाग : शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात आगमन झालेल्या १ लाख घरगुती आणि २७५ सार्वजनिक गणपतीपैकी दीड दिवस मुक्कामाच्या २३ हजार ८९४ घरगुती, तर १० सार्वजनिक गणपतीना शनिवारी जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात, भजन-कीर्तनात आणि ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... ’ अशा जयघोषात गणेशभक्तांनी निरोप दिला. दुपारी ३नंतर सहकुटुंब दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाला पर्जन्यवृष्टीतच सुरुवात झाली. अलिबागसह जिल्ह्यातील किनारपट्टीतील गावांतील गणेश विसर्जन समुद्रात करण्यात आले. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील विविध तलाव, खाड्यांमध्येही विसर्जन करण्यात आले. गणेश आगमनाबरोबरच जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे बळीराजा खूश असला, तरी गणेशभक्तांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे.जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या निमित्ताने सर्व समुद्रकिनारे फुलून गेले होते. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकांच्या निमित्ताने कोठेही अनुचित प्रकारांची नोंद झाली नसल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली. गणोशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी तैनात आहेत. याबरोबर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी किनारा परिसरात वाहतूक पोलीस कर्मचाºयांचीही नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूककोंडीतून भक्तांची चांगलीच सुटका झाली. दरम्यान, बाप्पाचे घरोघरी आगमन झालेले असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक श्रीगणेशोत्सवात शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या हस्ते ‘निर्मल आरती संग्रहाचे’ प्रकाशन करण्यात आले. निर्मल जिल्ह्याकडे वाटचाल करणाºया रायगड जिल्ह्यात या आरती संग्रहाच्या माध्यमातून गणेशोत्सवात जनजागृती करण्यात येणार आहे. या वेळी निर्मल रायगड जिल्हा कार्यक्र म व्यवस्थापक जयवंत गायकवाड, शिक्षणाधिकारी बी. एस. बढे, सुरेश म्हात्रे व कर्मचारी उपस्थित होते.
दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 4:10 AM