शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा स्थगित; समस्यांबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई लवकर घेणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 12:04 AM2020-02-05T00:04:44+5:302020-02-05T00:06:02+5:30
राज्य शासनाकडून दखल
पेण : रायगड जिल्ह्यातील पेण आणि खालापूर तालुक्यातील तब्बल २४८ शेतकऱ्यांनी रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनविरोधात पेण ते मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानापर्यंत विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न पायी मोर्चा काढण्याचा इशारा १५ दिवसांपूर्वी दिला होता. कालपर्यंत कोणतीही दखल राज्यस्तरावर घेण्यात न आल्याने मंगळवारी पेण प्रांत कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात होणार होती. मात्र, मोर्चा सुरू होण्यापूर्वीच याची दखल राज्य शासनाकडून घेतली गेली. यामुळे मोर्चेकऱ्यांनी आपला मोर्चा पेणमध्येच स्थगित करून लवकरच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे विष्णू पाटील यांनी सांगितले.
रिलायन्स गॅस कंपनीने येथील ५२९ बाधित शेतकऱ्यांपैकी ३८१ शेतकऱ्यांना साडेपाच ते सात लाखांपर्यंतचा मोबदला दिला. तर उर्वरित पेणमधील १४८ आणि खालापूरमधील १०० शेतकऱ्यांना ८० हजार रुपयांचा मोबदला देऊन शेतकºयांची फसवणूक केली असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी निवेदनातून केला आहे.
एवढेच नव्हे तर यातील १५ शेतकऱ्यांना तर कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता कंपनीने ही पाइपलाइन टाकली असल्याचा आरोपदेखील शेतकऱ्यांनी केला असून, जोपर्यंत आम्हाला आमचा योग्य तो मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे शेतकºयांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांची दखल घेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी याबाबत चर्चा केली.
शेतकऱ्यांना आशा
लवकरच मंत्रालयस्तरावर या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता बैठक आयोजित करण्यात येणार आहे, त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती विष्णू पाटील यांनी दिली. तसेच लेखीपत्र पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्हा शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील, अशी आशा शेतकºयांना आहे.