दीड तासांच्या प्रयत्नांती तरुणाला वाचविण्यात यश
By admin | Published: July 16, 2017 02:53 AM2017-07-16T02:53:53+5:302017-07-16T02:53:53+5:30
उमरोली गावातील नागरिकांना पावसाळ्यात गावात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. नदी पार करूनच घरी पोहोचावे लागते. जीवावर उदार होऊन येथील ग्रामस्थांना
- लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : उमरोली गावातील नागरिकांना पावसाळ्यात गावात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. नदी पार करूनच घरी पोहोचावे लागते. जीवावर उदार होऊन येथील ग्रामस्थांना नदीवर असलेल्या छोट्या पुलावरून जावे लागते. याच पुलावरून शनिवारी दुपारी एक तरुण जात असताना पाय घसरल्याने पाण्यात पडला. धुवाधार पावसामुळे त्याला बाहेर येणे शक्य झाले नाही. अखेर अग्निशमन दल व तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने त्याचा जीव वाचवला.
जवळपास हजारो लोकवस्ती असलेले उमरोली गाव गाढी नदीच्या किनारी वसलेले आहे. गावातील नागरिकांना नदीवरील छोट्याशा फरशी पुलावरून जावे लागते. पावसाळ्यात फरशीवरून जाताना नागरिकांची तारांबळ उडते. या ठिकाणी पाय घसरून पडल्याने कित्येक जण जखमी झाले आहेत. तर काहींना जीव गमवावा लागला आहे. शनिवारी दुपारी ३च्या सुमारास झारखंड येथे राहणारा २२ वर्षीय युवक अजय सिंग हा हरीग्राम येथील इमारतीवरील काम आटोपून उमरोली गावात जात होता. नदीला आलेला पूर पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला नदीतून न जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही त्याने फरशीवरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नदीतून जात असताना त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला व वाहून जाऊ लागला. अग्निशमक दलाचे अनिल जाधव, सहायक पोलीस निरीक्षक शालिग्राम, शैलेश ठाकूर यांच्या मदतीने अग्निशमक दलाच्या जवानांनी दोरीच्या साहाय्याने मोठ्या प्रयत्नाने दोरीच्या साहाय्याने एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर अजय सिंग याचा जीव वाचविला. या वेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
जवळपास १०० फूट पुढे असलेल्या कातळावर सिंग अडकला. आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब अग्निशमक दलाला कळविले व सिडको व महापालिकेची अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली.