- मधुकर ठाकूर
उरण : माजी केंद्रीय कृषिमंत्री, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांचा वाढदिवस आणि संसदीय कार्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फुंडे -उरण येथील वीर वाजेकर कॉलेजमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (११) विविध वयोगटात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत रयतेच्या ४० शाळा युनिटमधील २८०४ विद्यार्थी सहभागी होते.
रयत संस्थेकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. खुल्या गटातील २१ किलोमीटर आणि महिलांसाठी दहा किलोमीटर तसेच महाविद्यालयीन १९, १७, आणि १४ वर्षाखालील मुले आणि मुली एकूण दहा गट या स्पर्धेत खेळवण्यात आले. प्रत्येक गटातून पहिल्या पाच स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य रामशेठ ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी. जे. पाटील, जनरल बॉडी सदस्य जे. एम. म्हात्रे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, जनरल बॉडी सदस्य सुधीर घरत, महाविद्यालय विकास समिती सदस्या भावना घाणेकर, स्कूल कमिटी चेअरमन कृष्णकांत कडू, रायगड विभागाचे इन्स्पेक्टर आर. पी. ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.