उदरनिर्वाहासाठी महिला करतात हमाली; 'अशी' आहे संघर्ष करणाऱ्या महिलांची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 10:59 PM2019-10-31T22:59:17+5:302019-10-31T23:00:03+5:30
माथेरानमध्ये आदिवासी वाहतात पर्यटकांच्या बॅगा
माथेरान : स्त्री ही नेहमीच आपल्या कुटुंबासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत कष्टच करत असते. मात्र, तिचे हे कष्ट बऱ्याच वेळा मातीमोल ठरतात. असे असले तरी माथेरानच्या पायथ्याशी राहणाºया आदिवासी महिला घरातील कामे करून आपल्या कु टुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कष्टाचे काम करताना दिसून येतात. माथेरान हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे देश-विदेशातून पर्यटक येतात. या पर्यटकांच्या बॅग डोक्यावरून वाहून नेण्याचे काम या महिला करतात आणि आपला सांसाराचा गाडा हाकतात.
माथेरान सारख्या उंच डोंगरमाथ्यावर येणाºया पर्यटकांवर येथील जनजीवन अवलंबून आहे. कुठल्याही प्रकारची औद्योगिक विकास यंत्रणा अद्यापही येथे कार्यान्वित नाही. कारण मुळातच हे एक प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेले आहे. येथे घोडा, हातरिक्षा हीच आजपर्यंत दळणवळणासाठी कार्यरत असलेली प्रमुख वाहने आहेत. कुणी पॉइंट्सवर स्टॉल्स उभारून व्यवसाय करत आहेत, तर कुणी घरगुती खानावळ करून उदरनिर्वाह साधन उपलब्ध करीत आहेत, तर काही महिला या येणाºया पर्यटकांच्या सामानाची डोक्यावरून वाहतूक करताना दिसत आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी माथेरानच्या पायथ्याशी असणाºया आदिवासी महिला मोठ्या प्रमाणात येथे येऊन कष्ट करून आपली उपजीविका भागवत आहेत. माथेरानची लोकसंख्या जरी जेमतेम पाच हजारांच्या आसपास असली तरीसुद्धा आजूबाजूला राहणाºया एकूणच २५ हजार लोकांची उपजीविका केवळ माथेरान याच स्थळावर अवलंबून असते. येथे अनेक महिला आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वर्षानुवर्षे ओझे वाहण्याची कामे करत आहेत. कदाचित शासनाच्या योजना या दुर्गम स्थळापर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळेच महिला गृह-उद्योग सारखे उपक्रम राबविण्यास जर सुरुवात झाली तर कोणत्याही महिलेला अतिकष्टदायी कामे करावी लागणार नाहीत. त्या आपल्या श्रमातून मोती पिकवत आहेत.