अलिबाग : प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांच्या अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील आलिशान रिसॉर्टवर शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने बुलडोझर फिरवला. सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृतपणे वाढीव बांधकाम मित्तल यांनी केले होते. दुपारी ३ वाजता प्रशासनाने अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. सुमारे १४०० स्केअर मीटरचे बांधकाम पूर्ण भुईसपाट करावे लागणार असल्याने पुढील काही दिवस अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
१ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मित्तल यांच्या अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अशोक मित्तल यांना २१ एप्रिल २०१९ पूर्वी अनधिकृत बांधकाम स्वत:हून पाडावे, अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावली होती. मित्तल यांनी स्वत:हून बांधकाम पाडण्यास सुरु वात केली होती; परंतु त्यांच्यामार्फत पूर्ण बांधकाम पाडण्यात आले नव्हते. आज सकाळीही त्यांच्याकडून तसा प्रयत्न सुरू होता. तसेच रिसॉर्टमधील मौल्यवान वस्तू, महागडे वॉलपिस, अन्य किमती वस्तू मित्तल यांनी आधीच हलवल्या आहेत. शुक्रवारी सुरू करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.