आगरदांडा : मुरुडमधली अनधिकृत बांधकामावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी सलग दोन दिवसांपासून कारवाईला सुरुवात के ली आहे.मुरुड शहरातील विविध कामांवर त्यांनी हातोडा चालवल्यामुळे अनधिकृत कामे असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.शनिवारी मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी जैन समाज मंदिरच्या जवळच ग्रीन झोन क्षेत्रात अमृत ताराचंद जैन यांच्या जागेत पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. त्यांना याबाबत नोटीस बजावण्यात आली होती; परंतु त्यांनी आपले अतिक्रमण वेळेत न हटवल्यामुळे नगरपरिषदेने जेसीबीच्या साह्याने हे बांधकाम तोडले. या वेळी पोलीस बंदोबस्तासह हे काम तोडण्यात येऊन ही जागा मोकळी करण्यात आली. गावदेवी पाखाडीमधील विजय रामचंद्र दोडकुलकर यांनी वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण केले होते, तेसुद्धा काम तोडण्यात येऊन वहिवाट मोकळी करून दिली. तर कोळीवाडा परिसरातील इस्माइल मकबूल शेख यांनी गटारावर पायरी व गाळा बांधला होता तोही तोडण्यात आला आहे.
अतिक्रमण हटवण्यासाठी अशीच कारवाई सुरू राहणार आहे. माझ्या कालावधीत ग्रीन झोन क्षेत्रात ज्यांनी काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई ही होणारच आहे. अनधिकृत बांधकाम तोडण्याची मोहीम ही ग्रीन झोन क्षेत्रातील कामावर केली आहे. जैन समाजमंदिर हेसुद्धा ग्रीन झोन क्षेत्रात आहे. सबनीस आळी येथे राहणारे बाबासाहेब कोटक, भागीरथीबाई साखरकर, गिरीश पाटील, सचिन कासेकर यांच्या इमारती जीर्ण झाल्याने त्या तोडण्यात याव्यात, यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. - दयानंद, गोरे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, मुरुड