लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधितांवरील उपचारांत प्राधान्यक्रमावर असलेल्या रेमडेसिविरच्या वापरामुळे ९० रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचे आढळून आल्याने या विशिष्ट ब्रँडच्या औषधाचा वापर थांबविण्यात आल्याचा प्रकार रायगड जिल्ह्यात घडला आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी ही माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील तीन विविध रुग्णालयांमधील ९० कोरोनाबाधितांवर हेटेरो ड्रग्ज या कंपनीतर्फे उत्पादित करण्यात आलेल्या रेमडेसिविर औषधांनी उपचार करण्यात येत होते. मात्र, औषधाच्या मात्रा शरीरात जाताच रुग्णांमध्ये थंडी वाजणे, रक्तदाब अचानक कमी होणे, तापात चढ-उतार होणे, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे इत्यादी प्रकारचे दुष्परिणाम आढळून आले. अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी यासंदर्भात संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अधिक तपास केला असता संबंधित औषधे हेटेरो ड्रग्ज या कंपनीत उत्पादित झाल्याचे स्पष्ट झाले. शिंगणे यांनी तातडीने यावर कारवाई करत संबंधित कंपनीकडून उत्पादित होणाऱ्या रेमडेसिविर औषधाच्या वापरावर स्थगिती आणली. कंपनीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे शिंगणे यांनी सांगितले.