शाळा सुरू करण्यासाठी कष्टकऱ्यांचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 12:16 AM2021-01-12T00:16:03+5:302021-01-12T00:16:21+5:30
डहाणू प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या : आदिवासी भागातील मुलांचे होते नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : कोविडमुळे राज्यातील शिक्षण क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असून पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील शिक्षण व्यवस्था अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे डहाणू प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळा तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सुरू कराव्यात, या मागणीसाठी कष्टकरी संघटनेने डहाणू प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला.
आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्याबाबत संघटनेचे अध्यक्ष ब्रायन लोबो यांनी निवेदन सादर केले. या मोर्चात शेकडो विद्यार्थी, पालक व संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले.
डहाणू प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १७ वसतिगृहे व ३५ आश्रमशाळा आहेत. तसेच तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४७१ प्राथमिक व ४८ माध्यमिक शाळा आहेत. लॉकडाऊनमध्ये शहरातील विद्यार्थ्यांना काही प्रमाणात ऑनलाइन शिक्षण मिळाले. परंतु आदिवासी भागात ऑनलाइन व्यवस्था पूर्णतः अपयशी ठरली. डहाणू व पालघरमधील डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना आदिवासी क्षेत्रातील शाळा अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेत टिकण्यासाठी शाळा नियमित सुरू करणे हा पर्याय असल्याचे कष्टकरी संघटनेचे म्हणणे आहे.
प्रकल्पात समाविष्ट आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेऊन त्यांना निवासी राहण्याची व्यवस्था करावी, चालू शैक्षणिक वर्ष मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवून १० दिवसांनंतर जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, इ. मागण्यांचे निवेदन कष्टकरी नेते ब्रायन लोबो, मधुबेन धोडी, सिराज बलसारा यांच्या शिष्टमंडळाने सहायक प्रकल्प अधिकारी शकुंतला मते, उमेश काशीद व पं.स.चे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी आम्हाला स्मार्टफोन द्या, कुठे आहे जंगलात नेटवर्क? ऑनलाइन शिक्षण बंद करा, आमची शाळा सुरू करा, अशा घोषणा देत शेकडो विद्यार्थ्यांनी प्रकल्प आवारात ठिय्या आंदोलन केले.