लोकमत न्यूज नेटवर्कश्रीवर्धन : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दक्षिण काशी हरिहरेश्वर ते श्रीवर्धन मार्गावर मारळ गावानजीक रस्त्यावर मंगळवारी सकाळी दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.सकाळी सुमारे ६.३०च्या सुमारास दरड कोसळली असून, तत्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घटनास्थळी पोहचून रास्ता मोकळा के ला. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. या वेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पंचायत समिती गटविकास अधिकारी हंबीर, पोलीस आदी यंत्रणा उपस्थित होती. श्रीवर्धन ते हरिहरेश्वर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते, मात्र दरड कोसळली त्या वेळी सुदैवाने येथे कोणीही नसल्यामुळे मोठी हानी टळली. रत्नागिरी व रायगड या दोन कोकणातील जिल्ह्यांना जोडणारी बागमांडला बाणकोट खाडी हरिहरेश्वरपासून काहीच अंतरावर असल्यामुळे या मार्गावरून वाहने धावत असतात. मारळ येथे दरड पडल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर ते श्रीवर्धनमधील शेखाडी मार्ग दरड कोसळण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र मारळमध्ये प्रथमच असा प्रकार घडला असून, अशा ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना तहसीलदार सूर्यवंशी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिल्या आहेत.
हरिहरेश्वर - मारळ मार्गावर दरड कोसळली
By admin | Published: June 14, 2017 1:03 AM