महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या जागेमधील घरावर हातोडा; मुस्लीम कुटुंबाचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:52 AM2019-06-21T00:52:30+5:302019-06-21T00:52:36+5:30
अलिबागमधील नागरिकांनी एकत्र येत केला विरोध; पावसाळा संपेपर्यंत राहण्याची मागितली मुदत
अलिबाग : साहेब आमच्या घरावर हातोडा पाडू नका...भर पावसात आमचे कु टुंब रस्त्यावर कोठे राहणार... आमच्यावर दया करा... पावसाचा हंगाम संपल्यावर आम्ही जागा खाली करतो...अशी कळकळीची विनंती करूनही एमएमबीने मुस्लीम कुटुंबाच्या घरावर हातोडा पाडला आणि मुस्लीम कुटुंबातील महिलांनी एकच टाहो फोडला. ही घटना आहे अलिबाग शहरातील एमएमबीच्या कार्यालय परिसरातील हाफसाणकर कुटुंबाची.
येथील महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या (एमएमबी) जागेमध्ये गेली ६२ वर्षे एक मुस्लीम कुटुंब राहत आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच एमएमबीने त्यांना जमीन खाली करून देण्याबाबत नोटीस काढली होती. त्यामुळे त्या कुटुंबाची चांगलीच धावधाव झाली. पावसाळा संपल्यावर नजीकच्या जागेमध्ये स्थलांतरित करण्याचे मुस्लीम कुटुंबाने मान्य केल्यावरही एमएमबीने गुरुवारी त्यांच्या घरावर हातोडा पाडला. एमएमबीच्या कार्यालय परिसरामध्ये मुस्लीम समाजासह हिंदू समाजातील नागरिकांनी गर्दी केली. त्यांनी एमएमबीच्या कृत्याला कडाडून विरोध केला. मात्र, एमएमबी ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हती. एमएमबीच्या अन्यायामुळे माझे जीवन संपवून टाकतो असे मुफीद हाफसाणकर याने सांगताच पोलीस यंत्रणाही चांगलीच सतर्क झाली. हा प्रकार प्रादेशिक बंदर अधिकारी अजित टोपणो यांच्या कार्यालयाच्या परिसरातच घडत होता, मात्र त्यांनी सुरुवातीला ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे नागरिक कमालीचे संतापले. नागरिकांचा पारा चढत असल्याने पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर प्रादेशिक बंदर अधिकारी टोपणो त्यांच्या दालनात हजर झाले. हाफसाणकर कुटुंबाला जागा खाली करण्याची नोटीस आधीच दिलेली आहे. तसेच वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्याबाबत स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे कारवाई करण्यात येत असल्याचे टोपणो यांनी स्पष्ट केले. त्यावर हाफसाणकर यांची बाजू मांडणारे अॅड. जुनेद घट्टे यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले आहे. त्यामुळे असा एकतर्फी निर्णय घेता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या केसचा नंबर देखील अॅड. घट्टे यांनी दाखवला. उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आल्याने तूर्तास कारवाई स्थगित करावी अशा मागणीचे निवदेन द्या, असे टोपणो यांनी सांगितले.
१९५७पासून हाफसाणकर यांचे वास्तव्य
अलिबाग समुद्रकिनारी एमएमबीचे कार्यालय आहे. त्याच परिसरामध्ये मोहमंद युसूफ इब्राहिम हाफसाणकर हे त्यांच्या कुटुंबासह १९५७ सालापासून या ठिकाणी राहत आहेत. या जागेबाबत एमएमबीसोबत वाद सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी राजीव सिन्हा यांनी हाफसाणकर यांच्या झोपडीवजा घराएवढी जागा सर्वे नंबर ४३/ अ मध्ये दिली आहे. काही कारणामुळे त्या जागेत हे कुटुंब स्थलांतरित झाले नाही. त्यानंतर हाफसाणकर यांचे निधन झाले. त्यानंतर आहे त्याच जागेत हे कुटुंब वास्तव्य करत आहेत. हा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने हाफसाणकर यांचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे एमएमबीने ही जागा खाली करून द्यावी अशी नोटीस हाफसाणकर यांच्या कुटुंबाला बजावली; परंतु पावसाळ्यात आम्ही कसे बाहेर जाणार, पावसाळा संपल्यावर नेमूण दिलेल्या जागेत स्थलांतरित होणार असल्याचे हाफसाणकर यांचा मुलगा मुफीद याने मान्य केले होते.
पावसाळ्यात एखाद्याला बेघर करणे हे नैसर्गिक न्यायाच्या कक्षेत बसत नाही. हाफसाणकर कुटुंब पावसाळा संपल्यावर स्थलांतरित होतील, त्यासाठी शपथपत्र देखील देण्यास तयार आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तसे नमूदही केले असल्याकडे स्थानिक नागरिक अल्ताफ घट्टे यांनी ‘लोकमत’शी बोलताना लक्ष वेधले.
बंदर विभागाचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाला कारवाई थांबवण्याचे पत्र द्या, आम्ही कारवाई करणार नाही असे सांगितले असताना देखील एमएमबीच्या कार्यालयातील परिसराचे गेट बंद करून घर पाडायला सुरुवात केली. घरात लहान मुले आहेत, मूकबधिर बहीण आहे, पावसात घराबाहेर काढल्यावर राहणार कोठे असा सवाल मुफीद हाफसाणकर याने ‘लोकमत’ला सांगितले.
एमएमबीच्या हद्दीमध्येच नगरपालिकेने स्वच्छतागृह बांधले आहेत. ते पाडण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिलेले असतानाही एमएमबीने ते बांधकाम पाडलेले नाही, मात्र हाफसाणकर परिवाराला बेघर करण्यासाठी लगेचच का कारवाई केली जाते, असाही प्रश्न आहे.