मुरुड नगरपरिषदेचा गटारावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा
By admin | Published: May 25, 2017 12:17 AM2017-05-25T00:17:58+5:302017-05-25T00:17:58+5:30
मुरुड शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी गटारावर लाद्या टाकून, या जागेचा वापर केल्याने पावसात गटाराचे पाणी तुंबत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव/ मुरुड : मुरुड शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी गटारावर लाद्या टाकून, या जागेचा वापर केल्याने पावसात गटाराचे पाणी तुंबत होते. यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. यामुळे मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी गटारावरील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कार्यवाहीस सुरु वात केली आहे. पहिल्या सत्रात त्यांनी मासळी मार्केट भागात झालेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवून ही बांधकामे जमीनदोस्त केली.
काही दिवसांपूर्वी मुरु ड बाजारपेठ भागाकडे लक्ष देत तेथील सर्व व्यापाऱ्यांना नगरपरिषदेच्या वतीने नोटीस पाठवून गटारावरील बांधकाम तोडण्यास सांगितले. यानंतर यातील काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून पुढे येऊन गटारावरील लाद्या व कडापे काढून स्वत:हून सहकार्य केले, तर काही कामे ही नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी केली आहेत. बाजारपेठ भागात काही ठिकाणी गटारावरील बांधकाम दूर केल्यावर तेथील लाद्यांचे तुकडे व मातीचे ढीग तसेच ठेवल्याने वाहतुकीस मात्र मोठी समस्या उद्भवली आहे.
ठिकठिकाणी मातीचे ढेर दिसून येत आहेत, हा कचरा अद्यापपर्यंत उचलला गेलेला नाही. काही काळातच आणखीन काही ठिकाणी गटारावरील बांधकामे तोडण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे आत्ता या पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.